राजकीय वार्तापत्र | कर्जत तालुक्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले जोमात : अगामी काळात राजकीय भूकंपाचे संकेत

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( डाॅ अफरोज पठाण ) अगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये राजकीय भूकंपाचे चिन्हे दिसत आहेत. बड्या राजकीय पक्षांनी इनकमिंग आऊटगोईंग पॅटर्न हाती घेतल्याने कर्जतच्या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी, भाजपासह काँग्रेसमध्ये देखील मोठा उलटफेर घडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगामी काळात राजकीय भुकंपामुळे कर्जत तालुका पुन्हा एकदा चर्चेत येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

राजकीय भूकंपाची पहिली झलक नुकतीच राष्ट्रवादीने दाखवली आहे.माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या काही कट्टर समर्थकांनी शिंदे यांच्यावर नाराजी दाखवत नुकतेच हाती घड्याळ बांधले. राष्ट्रवादी गेलेले हे पदाधिकारी भाजपची सत्ता असताना अनेक लाभांच्या पदावर विराजमान होते. आ रोहित पवार यांच्या कार्यावर “फिदा” होऊन उंबरठ्यावर असणाऱ्यांनी देखील आता राष्ट्रवादीची कास धरली आहे.

एकेकाळी राम शिंदे हे मंत्री असताना भोवताली असणारा लवाजमा त्यांच्या पराभवानंतर दूर जाऊ लागला. कोणी वैयक्तिक तर कोणी कौटुंबिक समस्यांचा आधार घेत भाजपापासून अलिप्त होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात येऊ लागले. भाजपाची सत्ता असताना राष्ट्रवादीला सोडून भाजपात दाखल झालेले अनेकांनी आ रोहित पवार यांच्याशी जवळीक साधत “दादा, आम्ही आपल्याच सोबत आहोत. फक्त आम्हाला मान-सन्मान द्यावा” अशी गळ घालत बिनशर्त-विनाअट प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

अनेक वर्षे मतदारसंघात एकसंध दिसणारा भाजपा आता हळूहळू विस्कळीत होऊ लागलाआहे . अगोदरच लोकसभेच्या निवडणुकीत कर्जत- जामखेड विधानसभेत कमी मताधिक्य मिळाले असल्याने खा सुजय विखे यांनी आपल्या सत्कार समारंभात “सबका हिसाब होंगा” या वाक्याने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्याची धांदल उडवली होती. तदनंतर विधानसभेत राम शिंदेचा पराभव याच वाक्याला दुजोरा देणारा ठरला.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर कर्जतचे स्थानिक राजकारण शांत झाले होते. मात्र आता कर्जत नगरपंचायतीच्या निवडणूक समोर पाहता भाजपामधून आऊट गोईग सुरू झाले आहे.यामुळे स्थानिक राजकारणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा बार उडताना दिसु लागला आहे. आता भाजप कोणता डाव टाकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

खा सुजय विखे ३१ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका दौऱ्यावर असताना आ रोहित पवार आणि भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या पदाधिकाऱ्यांवर बोचरी टीका केली. कोणाचा जेसीबी, पोकलेन लावतो असे म्हणत त्यांना आपल्याकडे खेचले असे म्हणत फिरकी घेतली. तर आणखी जाण्याच्या तयारीत असल्याचे सुतोवाच करताना वाईन शॉप बंद असल्याने ते पण आपल्या प्रपंचासाठी जातील असे स्पष्ट करीत त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे देखील दर्शवले. मात्र जुने गेल्याशिवाय नव्याना तरी संधी कशी मिळणार असे म्हणत तरुण वर्गासाठी भाजपाचे दार उघडे असल्याचे संकेत त्यांनी या निमिताने दिले. यासह आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा काय करू शकते याची प्रचिती दिली असल्याने नगरपंचायत देखील जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

विखे, शिंदे आणि घुले यांची ‘ती’ भेट चर्चेची

भाजपा नेते नामदेव राऊत यांच्या कन्येच्या लग्नसमारंभात खा सुजय विखे, माजीमंत्री राम शिंदे आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यां तीन नेत्यांची राजकीय मैफिल तब्बल एक तास रंगली होती. या लग्नाच्या आदल्या दिवशीच खा विखे आणि राम शिंदे यांनी विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी भाजप सोडून गेलेल्यांना कानपिचक्या आणि वाटेवर असणाऱ्याना इशारा दिला होता. विखे ,शिंदे, व घुले या तिघांच्या या भेटीचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताच एका तासात नेमके काय घडले असेल ? अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

त्यांच्या वक्तव्याला महत्व देऊ नये – रोहित पवार

जामखेडच्या कार्यक्रमात खा विखेच्या टिप्पणीवर आ रोहित पवार यांना छेडले असता त्यांनी विखेचे वाक्य खोडून काढले. जिल्हा बँकेची निवडणूक मर्यादीत पदाधिकारीची असते तर नगरपंचायत निवडणूक सर्वसामान्य मतदारांची असते. आणि सर्वसामान्य मतदार आपल्या सोबत आहे. हे त्यांनी विसरू नये असे म्हणत आगामी काळात दोन्ही मतदारसंघात आपले विकास कार्य बोलेल असा विश्वास व्यक्त केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील चिंतनाची गरज

भाजपची सत्ता असताना ज्या नेत्यांनी भाजपाचे पदाधिकारी म्हणून अनेक पदांचा लाभ घेतला ते नेते भाजप सोडून राष्ट्रवादीत का गेले ?  अजुन काही जण जाण्याच्या वाटेवर आहेत ते का जाऊ पाहत आहेत ? यावर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आत्मचिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

भाजप राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देणार का?

भाजपचे काही पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीने हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून राजकीय होणार का ? याची उत्सुकता आहे. नुकत्याच एका विकासकामाच्या कार्यक्रमात माजी मंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांनी देखील काही नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जाणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आता भाजपात येणाऱ्या त्या नेत्यांचा प्रवेश कधी होणार ? याबाबत तर्क-वितर्क लावला जात आहे.