जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डाॅ विखे बोलत होते.
विखे पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमांतून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील असे स्पष्ट संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका,कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेवावेत, ही निवडणूक देशाची निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. त्याचबरोबर प्रचाराच्या नियोजनासाठी मतदारसंघातील बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून समजावून सांगितली जात आहे.