Vidhan Parishad election 2022 LIVE : राम शिंदेंच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी शिंदे समर्थक सज्ज, अडीच वर्षात ज्यांनी पाठ फिरवली तेही चमकू लागले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Vidhan Parishad election 2022 LIVE । राज्यात सध्या विधान परिषद निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपने (bjp) फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांच्या विधान परिषद उमेदवारीमुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता कर्जत-जामखेड मतदारसंघात शिगेला पोहचली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेेरच्या कुटुंबातील नववे वंशज असलेले राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडी धक्का देेत आपला उमेदवार निवडून आणला होता, या निवडणुकीत महा विकास आघाडीचे 10 मते फुटली होती.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमाताई खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, यातील प्रसाद लाड वगळता इतर चार उमेदवार भाजपाकडे असलेल्या सध्याच्या संख्याबळानुसार सहज जिंकून येऊ शकतात.त्यामुळे हे उमेदवार सेफ झोनमध्ये आहेत.

कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांनी राम शिंदे यांच्या विजयी जल्लोषाची तयारी हाती घेतली आहे. कर्जत – जामखेड तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका यानिमित्ताने सुरू आहेत. या बैठकांंमधूून गावोगावच्या कार्यकर्त्यांना जल्लोषाचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी मंत्री राम शिंदे यांचा सन 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला होता. गेल्या अडीच वर्षांपासून राम शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे अशी मागणी शिंदे समर्थक करताना दिसत होते, अखेर या मागणीला यश आले आणि राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी बहाल केली, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे राज्यभरातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील 25 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता, या बालेकिल्ल्याला 2019 च्या निवडणुकीत मोठे भगदाड पडले. पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात यावा अशी पक्षाची इच्छा आहे,त्यादृष्टीने भाजपने राम शिंदे यांना राजकीय ताकद देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्जत जामखेडमधील भाजपमध्ये मोठा जोश भरला गेला आहे. शिंदे यांच्या राजकीय पुनर्वसनामुळे भाजपला अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान 20 जून रोजी राम शिंदे यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आणि दणक्यात जल्लोष साजरा करायचा या इराद्याने गावागावातील भाजप कार्यकर्ते आत्तापासूनच तयारीला लागले आहेत.

अडीच वर्षात ज्यांनी पाठ फिरवली तेही चमकू लागले

राम शिंदे हे मंत्री असताना त्यांच्या अवती – भवती जो गराडा असायचा त्यातील अनेकांनी  विधानसभा निवडणूकीत शिंदे यांना गुलीगत धोका दिला. तर काहींनी मागील अडीच वर्षात शिंदे यांच्या पराभवानंतर पाठ फिरवली होती, त्यातील काही जण पक्षांतराच्या तयारीत होते. राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेक ‘लाभार्थी’ पुन्हा भाजपच्या गोटात चमकू लागले आहेत. काहींनी तर मुंबई गाठत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. तर काहीजण शिंदे हे मतदारसंघात कधी येतात, याकडे नजरा लावून बसले आहेत.