खळबळजनक : नाशिकच्या पोलीस निरीक्षकाने भाजप प्रदेश सचिवाला पाठवलेल्या स्फोटकांचा नागपुरात स्फोट, नागपूर जनरल पोस्ट ऑफिस मधील घटना !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नाशिकमधील एका पोलीस निरीक्षकाने भाजपच्या प्रदेश सचिवासाठी पाठवलेल्या पार्सलमधील स्फोटकाचा मुख्य डाकघरात स्फोट झाला. राज्याला हादरवणारी ही खळबळजनक घटना उपराजधानी नागपूरमधून मंंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आली.या घटनेने नागपूरात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांंनी देवळी (जि. वर्धा) येथे राहणारे भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाणे यांच्यासाठी स्फोटके पाठवली होती.पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी सोमवारी सायंकाळी नाशिक येथून स्फोटकांचे पार्सल पाठवले होते.

हावडा मेलने हे पार्सल मंगळवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावरील आरएमएस कार्यालयात आले. त्यानंतर सायंकाळी टपाल वाहनातून हे पार्सल जीपोओमध्ये आणण्यात आले. बुधवारी सकाळी हे पार्सल वर्धेला जाणार होते. परंतु, त्याआधीच सायंकाळी जीपीओमधील कर्मचारी पार्सल हाताळत असताना अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे एका पिशवीला आग लागली.सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.पोलिसांनी स्फोटके ताब्यात घेतली आहेत.

या घटनेची माहिती समजताच परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले, सहायक पोलीस आयुक्त नीलेश पालवे, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस, अमोल काचोरे, त्याचप्रमाणे बॉम्बशोधक व नाशक पथकाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

पार्सलमध्ये स्फोटकांची दहा पाकिटे होती. एका पाकिटात २४ स्फोटके होती. शेतातील माकडांना हुसकावून लावण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येतो, अशी माहिती आहे. ही स्फोटके धुळे जिल्ह्यातून खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटकांचे घर्षण झाल्याने किंवा पोस्टातील कर्मचाऱ्यांनी पार्सलची फेकाफेक केल्याने हा स्फोट झाला असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी उर्वरित स्फोटके ताब्यात घेतली असून सीताबर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.