महाराष्ट्रातील 6 खत कंपन्यांविरोधात होणार फौजदारी कारवाई, मोदी सरकारचे राज्य सरकारला आदेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात रासायनिक खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच काही रासायनिक खत कंपन्यांकडून मिश्र खतांची विक्री केली जात आहे. मिश्र खतांची विक्री करणाऱ्या टोळ्या देशभर सक्रिय आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या टोळ्यांविरोधात फौजदारी कारवाई हाती घेण्याचे आदेश मोदी सरकारने राज्यांना दिले आहेत. (Criminal action will be taken against 6 fertilizer companies in Maharashtra, Modi government orders state government)

मिश्र खतांची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात तक्रारी आल्यानंतर केंद्रीय रसायने व खत मंत्रालयाने देशभरात आठ राज्यात धाडी टाकल्या. यात अनेक गंभीर प्रकार समोर आले. अशाच प्रकारच्या धाडी महाराष्ट्रातही टाकण्यात आल्या होत्या. यात शेतकऱ्यांची लूट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहा कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी असे आदेश मोदी सरकारने राज्य सरकारला दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

30 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय खते मंत्रालयाने देशातील मिश्र खतांच्या उत्पादक कंपन्यांची तपासणी केली होती. या धाडीत महाराष्ट्रातील कंपन्यांचे काळे कारभार केंद्रीय पथकाच्या हाती लागले होते.यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. यामुळे महाराष्ट्रातील सहा कंपनी विरोधात फौजदारी कारवाई करावी असे आदेश मोदी सरकारने काढले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सुरू असलेले बेकायदेशीर खत उत्पादक प्रकल्प तातडीने बंद करावेत, दोषींवर केंद्रीय खते नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम 3 अन्वये कारवाई करावी, दोषी कंपन्यांचे खते उत्पादन आणि विक्रीचे परवाने तातडीने रद्द करावेत, शेतकऱ्यांना अप्रमाणित खते विक्री केल्याप्रकरणी दोषी कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे म्हटले आहे.

रासायनिक खतांचे रॅकेट चालवणाऱ्या महाभागांना संबंधित राज्यातील कृषी अधिकारीच आतुन मदत करतात, त्यामुळे केंद्रीय पथकाने स्वतः पथके तयार करुन देशभर धाडी टाकल्या. यातून समोर आलेले घोटाळे कसे दडपायचे याचा आटोकाट प्रयत्न खत कंपन्यांकडून सुरू आहे. त्यामुळे आता दोषी कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने उगारलेला कारवाईचा आसुड राज्य सरकार गतिमान करणार का ? याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

भाजपा नेते तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कंपनीसह सांगलीतील वसंत ॲग्रोटेक, नागपुरातील विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद मधील देवगिरी फर्टीलायझर्स, यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे वृत्त न्यूज 18 लोकमत व ॲग्रोवनने दिले आहे.

यापूर्वी 2019 मध्ये कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल वर फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते ,आता दुसऱ्यांदा याच कंपनीवर फौजदारी कारवाईचे आदेश मोदी सरकारने दिल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केली आहे