भाजपकडून माजी मंत्री राम शिंदेसह सात जण विधानपरिषदेसाठी स्पर्धेत !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह सात जण स्पर्धेत आहेत.

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे.त्यातच आता विधानपरिषदेचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक झालेली आहे. विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी सात जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय इतर नावांचीही चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहे.यामध्ये कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या गुड बुक मधील माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाची चर्चा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांना राज्यसभेची लॉटरी त्यांना लागू शकली नव्हती , मात्र आता राम शिंदे यांना विधान परिषदेची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली आहे.

भाजपकडून चर्चेत असलेली नावं

• राम शिंदे– विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक राम शिंदे ओळखले जातात, ते मागील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मात्र गेल्या विधानसभेत कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांविरोधात त्यांचा पराभव झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज म्हणून राम शिंदे ओळखले जातात. ओबीसी समाजातील अत्यंत अभ्यासू नेता अशी राम शिंदे यांची राज्यात ओळख आहे.

• पंकजा मुंडे – फडणवीसांच्या मंत्री मंडळात मंत्री होत्या, मात्र गेल्या विधानसभेला धनजंय मुंडे यांच्याविरोधात परळीतून पराभव झाला.

• प्रवीण दरेकर– सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. भाजपमधील आक्रमक चेहरा अशी ओळख.

• प्रसाद लाड– भाजपमधील आक्रमक चेहरा, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महत्वाची जबाबदारी लाड यांच्यावर आहे.

• हर्षवर्धन पाटील– गेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेले, मात्र इंदापुरातून दत्ता भरणे यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला.

• चित्रा वाघ– गेल्या विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या.

• गोपाल आग्रावाल– काही दिवसांत मुंबई महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत, त्यामुळे आग्रवालांना उमेदवारी दिल्याने समतोल राहू शकतो

भाजपकडून किती जण निवडून जाणार?

भाजपकडील सध्याच्या आकडेवारीचा विचार केल्यास भाजपकडून चार जणांना आरामात विधान परिषदेवर संधी मिळू शकते. मात्र पाच जणांना विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे ते पाच उमेदवार कोण असणार? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.