कर्जत : देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर रोहित पवार, शनिवारी कर्जतमध्ये होणार राजकीय भूकंप, राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक जण करणार भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शनिवारी मोठा राजकीय भूकंप होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील अनेक जण भाजपात दाखल होणार आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेली इनकमिंग मोहिमेची खेळी आमदार रोहित पवारांसाठी मोठा धक्का देणारी असणार आहे.

Rohit Pawar on Devendra Fadnavis' radar, political earthquake in Karjat on Saturday, many to join BJP under Ram Shinde's leadership

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात पक्षांतराची लाट आली होती. याचा फटका भाजपला बसला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार बनले तेव्हापासून शिंदे यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क वाढवला आहे. त्याबरोबर पक्षाची बांधणी वेगाने हाती घेतली आहे. आमदार रोहित पवारांना अगामी 2024 च्या निवडणुकीत धडा शिकवायचाच या इराद्याने शिंदे यांनी राजकीय खेळ्या खेळण्यास प्रारंभ केला आहे.अतिशय आक्रमकपणे त्यांनी पवारांविरोधात लढाई पुकारली आहे.

‘आपला तो आपलाच’ या शब्दप्रयोगातून आमदार प्रा.राम शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघातील जनतेला भावनिक साद घातली आहे. यामुळे शिंदे यांना जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, अश्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील नाराज आजी – माजी पदाधिकारी आता भूमिपुत्राच्या अर्थात आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे, आमदार शिंदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास दाखवत मतदारसंघातील अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते येत्या शनिवारी भाजपावासी होणार आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून शनिवार दि 11 मार्च 2023 रोजी कर्जतमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील महत्वाचे नेते, कार्यकर्ते, अनेक गावांचे सरपंच, आजी – माजी पदाधिकारी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा रोहित पवारांना मोठा धक्का देणारा ठरणार आहे.