कर्जत – जामखेड मतदारसंघात होणार मोठा राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार मेगा भरती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंपाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून लवकरच भाजपात मोठी मेगाभरती केली जाणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससह आदी पक्षांना या राजकीय भूकंपाचे हादरे बसणार आहेत.भाजपने हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेत कोण – कोण जाणार याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

big political earthquake will happen in Karjat-Jamkhed Constituency, mega recruitment will be held in the presence of Deputy Chief Minister Devendra Fadnavis.

रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर मतदारसंघात अनेक पक्षांतरे घडवून आणले. यासाठी त्यांनी दबाव, दडपशाही अन सत्तेचा गैरवापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राज्यात सत्तांतर झाले, त्यातच प्रा.राम शिंदे हे आमदार झाल्यापासून मतदारसंघातील राजकीय चित्र बदलले आहे. गेल्या तीन वर्षांत आमदार रोहित पवारांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना हवी ती ताकद आणि मानसन्मान दिला न गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. या अस्वस्थतेचा बांध फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात होती, ही चर्चा लवकरच सत्यात उतरणार आहे.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपमय करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जोरदार कंबर कसली आहे. मतदारसंघातील अनेक बडे मासे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत इतर पक्षातील आजी – माजी पदाधिकारी आपल्या समर्थकांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. लवकरच हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेत अनेक बड्या नेत्यांसह अनेक सरपंच आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. या राजकीय भुकंपामुळे महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडणार आहे. याचा मोठा फटका आमदार रोहित पवार यांना बसणार आहे. दरम्यान आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गळाला लागलेले बडे मासे कोण?  याचीच उत्सुकता मतदारसंघाला लागली आहे.कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपने हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेमुळे भाजपची राजकीय ताकद वाढण्यास मदत होणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.