जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून कुकडीच्या ओव्हर फ्लो आवर्तनाच्या पाण्यातून सीना धरण भरण्याची किमया झाली आहे. आता सीना धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाझर तलाव व सिमेंट बंधारे भरण्यासाठी शिंदे यांनी कुकडीच्या श्रीगोंदा कार्यकारी अभियंत्याला सुचना दिल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मागील तीन वर्षांत कुकडीचे पाणी कर्जत तालुक्यातील अनेक भागात पोहचले नव्हते. राज्यात सत्तांतर होताच आमदार राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याचा मुद्दा हातात घेतला. कर्जत तालुक्यात कुकडीचे पाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली.पाहता पाहता कुकडीच्या ओव्हर फ्लो आवर्तनातून सर्वदूर पाणी पोहचण्याची किमया झाली. कर्जत तालुक्यात पुर्ण दाबाने कुकडीचे पाणी पोहचले. अनेक लहान मोठे तलाव यंदा ओव्हर फ्लो झाले. यामुळे बळीराजा सुखावला आहे.
कर्जत तालुक्यातील लहान मोठे तलाव कुकडीच्या पाण्याने भरल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी आपला मोर्चा सीना धरणाकडे वळवला. भोसा खिंडीतून सीना धरणासाठी कुकडीचे पाणी सोडण्यात आले. पावसाचे पाणी आणि कुकडीचे पाणी यातून सीना धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सीना धरणावर कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी या तीन तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत. धरण भरल्यामुळे या भागातील बळीराजा आनंदून गेला.
सीना धरणाला डावा आणि उजवा हे दोन कालवे आहेत. उजव्या कालव्यातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे करताच शिंदे यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन सीना धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व त्यातून पाझर तलाव व सिमेंट बंधारे भरावेत असे आदेश कुकडीच्या श्रीगोंदा शाखेचे कार्यकारी अभियंता काळे यांना दिले आहेत.
“भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे कर्जत तालुक्यात यंदा पाणीच पाणी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्जत तालुक्यामध्ये कुकडीच्या पाण्याने यंदा कमाल केली आहे. यंदा कर्जत तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास निकाली निघाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे.“