जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून कर्जत जामखेड मतदारसंघात परतलेल्या आमदार राम शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांपासून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मतदारसंघातील विविध देवींचे दर्शन, आरती आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. राम शिंदे यांच्या दौऱ्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवारी कर्जत तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर शनिवारी सकाळपासूनच आमदार राम शिंदे हे जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. जामखेड तालुक्यातील प्रसिध्द देवींच्या मंदिरांना त्यांनी आज भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी देवीकडे प्रार्थना केली.
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना येणार्या कालखंडात कुठलेही संकट येऊ नये, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलं पाहिजे, कोरोना महामारी सारखी कुठलीही अडचण येऊ नये, अश्या प्रकारची प्रार्थना केली. अतिवृष्टीत ज्या भागात नुकसान झाले आहे. त्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लवकर मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
जलसंंधाण मंत्री असताना धोंडपारगाव, राजेवाडी, नान्नज, बोरले, जवळा या भागातून जी नदी वाहते त्यावर त्या कालखंडामध्ये जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणात कामं केली, आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधले, त्यामुळे या भागातील बागायती क्षेत्र वाढलयं, ऊसाचं उत्पादन देखील वाढलयं, या भागातील बळीराजा सुखी झाला याचा मोठा आनंद आहे असे शिंदे म्हणाले.
जलसंधारण मंत्री असताना मतदारसंघात केलेल्या भरीव कामामुळे मागील पाच वर्षांत कुठेही टँकरची गरज भासली नाही. हे त्याचचं फलित आहे. आपला माणुस, हक्काचा माणूस आणि ओळखीचा माणूस ज्या वेळेस मोठ्या पदावर जातो, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो, याची प्रचिती जनतेला मी मंत्री असताना आली होती, आता मी पुन्हा आमदार झालोय, सरकार परत आलयं, अजून दहा पंधरा दिवसात काय घडतयं का ते बघू असे म्हणतं राम शिंदे यांनी मंत्रीपदाबाबत सुतोवाच केले.
आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू गोटातील नेते म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. भाजपाने हाती घेतलेल्या मिशन बारामती या मोहिमेत राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या सोब राम शिंदे हे मागील आठवडाभर बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होते.
हा दौरा करून ते नुकतेच कर्जत-जामखेड मतदारसंघात परतले. त्यानंतर ते पुन्हा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. त्यांच्या दौर्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हवा बदलू लागल्याचे संकेत देऊ लागले आहे, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.