स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने खर्ड्यात होणार 75 फुट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून आणि स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन कार्यक्रमाचे खर्डा येथील शिवपट्टन किल्यासमोर आयोजन करण्यात आले आहे. 75 फुट उंच रावणाचे दहन होणार आहे. हा भव्य-दिव्य सोहळा ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

75 feet high effigy of Ravana will be burnt in Kharda in witness of the Swarajya dhwaj rohit pawar dasara melava 2022

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला भेडसावत असलेल्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय या दहा महत्त्वाच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे.

दसऱ्याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी त्यांचे दहन करण्याची परंपरा आहे. आपल्या या संस्कृती आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतिचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

या कार्यक्रमासाठी खर्डा येथे युवराज संभाजीराजे छत्रपती तसेच लोकप्रिय पौराणिक रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खर्डा येथे आजवरची राज्यातील सर्वात उंच म्हणजेच ७५ फुटी रावणाची प्रतिकृती मुंबईच्या मनश्री आर्ट्सच्या माध्यमातून साकारली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.