भाजपात सुध्दा घराणेशाही, भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्र्यांच्या मुलाची नियुक्ती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । काँग्रेस असो वा देशातील अन्य राजकीय पक्षातील घराणेशाही विरोधात भाजपकडून सातत्याने हल्ला केला जातो.आरोपांची राळ उठवली जाते. पण आता भाजपही (BJP Maharashtra) घराणेशाहीच्या राजकारणापासून अलिप्त नाही.असेच महाराष्ट्र भाजपमध्ये दिसत आहे. भाजपने माजी मंत्र्याच्या मुलाकडे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सोपवत घराणेशाही जपण्याचा प्रयत्न केला आहे. (Maharashtra State President of BJP Yuva Morcha)

Family rule in Maharashtra BJP, appointment of former minister's son as maharashtra state president of BJP Yuva Morcha, rahul Babanrao lonikar,

महाराष्ट्र भाजपमधील चार मंत्र्यांचे नातेवाईक पक्षात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाच आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचे पुत्र राहूल लोणीकर (Rahul Lonikar) यांची भाजपने युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.तसे नियुक्तीपत्र प्रदान केले.

काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षातील राजकीय घराणेशाही बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी भाषणांमध्ये टीका करीत असतात. तसेच भाजपमध्ये घराणेशाहीला वाव नाही, असा दावा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा करतात. तरीही महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मार्चाच्या अध्यक्षपदी लोणीकर पुत्राची वर्णी लावण्यात आली.यातून भाजपची पावले घराणेशाहीच्या दिशेने वेगाने पडत असल्याचा संदेश राज्यात जाऊ लागला आहे.

भाजपमध्ये सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे – आमदार नितेश राणे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – खासदार सूजय विखे-पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित – खासदार हिना गावित, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा अशा काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घराणेशाहीच्या जोडय़ा आहेत. याशिवाय अन्य काही छोटय़ा-मोठय़ा नेत्यांचाही यात समावेश आहे.आता लोणीकर पिता-पुत्रांची यात भर पडली.

मोदी- नड्डा हे घराणेशाहीच्या विरोधात टीकाटिप्पणी करीत असले तरी महाराष्ट्र भाजप त्याला अपवाद असावा, असेच चित्र दिसते. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांला संधी दिली जाते, असे विधान मध्यंतरी नड्डा यांनी केले होते. पण महाराष्ट्र भाजपमध्ये घराणेशाहीचा पगडा दिसू लागला आहे.