स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना रद्द करा ; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. भाजपच्या या मागणीमुळे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष पुन्हा तापणार आहे. (Cancel ward structure of local bodies, BJP’s demand to Election Commission)

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे.आता भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच, प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे भाजपने केली आहे.

भाजपचे जेष्ठ नेते आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आल्या आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

सदरची प्रभाग रचना सदोष असल्याने पुन्हा प्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बावनकुळे यांनी केलेल्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.