बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात, निष्ठा यात्रेची केेली घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs eknath shinde) हा संघर्ष आता उभा ठाकला आहे. शिवसेनेतील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ठाकरे यांनी यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. (Aditya Thackeray’s nishta yatra announcement, Thackeray at Maidan to teach lesson to the rebels)

शिवसेनेतील ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, त्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी आणि जनतेची संवाद साधणार आहेत. यासाठी त्यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे.पक्ष संघटना बांधणीसाठी ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

बंडखोर शिवसेना आमदारांना धडा शिकवण्यासाठी फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यानुसार युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुंबई मधील 236 शाखांचा तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून एकनिष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचे काम केले जाणार आहे.

एकनाथ शिंदेंसारख्या बड्या नेत्यानं बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरे मुंबईत एकादिवसाआड शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. तर आदित्य ठाकरे मैदानात उतरुन महाराष्ट्राचा दौरा करणाा आहेत. दुसरीकडे खासदार संजय राऊत देखील कामाला लागले आहेत. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील कडवट शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक आसुसले आहेत.शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांना नवी ताकद देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्र मैदानात उतरले आहेत. राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा राज्याचा दौरा गाजणार असेच आता दिसत आहे.