वातावरण तापलं ! आमदार राम शिंदेंविरोधात टीका होताच भाजप आक्रमक मोडवर, शरद कार्लेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे विरुद्ध पवार हा संघर्ष पुन्हा पेटला आहे. आमदार राम शिंदेंविरोधात राष्ट्रवादीने निषेध अंदोलन केले. या अंदोलनात शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर भाजपही आता आक्रमक झाली आहे. भाजपा युवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे वाभाडे काढले.

तुम्ही जर चुकीला चूक म्हणू शकत नसाल,तर ही चमकोगिरी करून काय साध्य करणार आहात ? असा सवाल करत आपल्याला किंमत यावी यासाठी जामखेड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवारांच्या मनमानी कारभाराचे समर्थन करून चमकोगिरी करण्याचं काम करत आहेत, परंतु भविष्यात ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे, याची चमकू कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी नाही असा थेट हल्ला कार्ले यांनी राष्ट्रवादीवर चढवला.
शासकीय नियम मोडून कारखाने आधी चालू करायचे आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऊस तोडून घ्यायचा आणि नंतर उशीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस राहिला आहे त्यांच्याकडून कमी भावामध्ये ऊस खरेदी करायचा अशी सरंजामी कारखानदारांनी चालू केली आहे. वास्तविक सर्वांना नियम सारखेच असले पाहिजेत.या कारखानदारांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी शेतकरी पुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांनी कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे अशी भूमिका शरद कार्ले यांनी यावेळी बोलताना मांडली.
ज्यावेळी उसाचा हंगाम संपत येतो तरी देखील सभासदांचा ऊस तोडला जात नाही आणि शेतकऱ्याला अडचणीत आणलं जातं, अशावेळी शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी टोळी मालकाला व त्यांच्या कारखान्याच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ऊस तोडून घ्यावा लागतो. मग याच काळात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. कमी भावामध्ये ऊस खरेदी करण्याचे काम हे कारखानदार लोक करत असतात. याच्याच विरोधात आवाज उठवत आ.प्रा.राम शिंदे यांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी याकरिता कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शरद कार्ले यांनी केली आहे.