ब्रेकिंग न्यूज : जामखेड – पाटोदा रस्ता वाहतुकीस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा – तहसीलदार योगेश चंद्रे यांचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाटोदा गावानजीक भवर नदीला पाणी आल्यामुळे पाटोदा – जामखेड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नदीला पाणी असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये.सध्या जामखेडला जाण्यासाठी आरणगाव पिंपरखेड फक्राबाद कुसडगाव जामखेड या मार्गाचा वापर करावा, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
आज 11 रोजी जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. पाटोदा परिसरातही सायंकाळी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे भवर नदीला पाणी आल्याने नदीवरील तात्पुरता पुल पाण्याखाली गेला होता. यामुळे जामखेडहून पाटोदामार्गे कर्जत आणि श्रीगोंद्याकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे.
पाटोद्यातील भवर नदीवर नव्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरता बायपास रस्ता आणि पुल उभारण्यात आला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या भागात झालेल्या दमदार पावसामुळे हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी नवा तात्पुरता पूल आणि रस्ता बनवण्यात आला होता. मात्र आज 11 रोजी सायंकाळी पुन्हा हा पूल पाण्याखाली गेला.यामुळे या भागातील वाहतूक बंद झाली आहे.
दरम्यान भवर नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानंतर या घटनेची माहिती पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना कळवली. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी तहसीलदार यांना पाठवले. त्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे हे आपल्या पथकासह तातडीने पाटोद्यात दाखल झाले. रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्यांनी या भागात पाहणी केली. जामखेड- पाटोदा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
दरम्यान भवर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत या भागातून जाणारी वाहने थांबवली. नदीला पाणी असल्याने वाहने जाऊ दिले नाही. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पाटोद्याला भेट दिल्यानंतर माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दाखवलेल्या समयसुचकतेचे कौतुक केले.गफ्फारभाई पठाण नेहमी प्रशासनाला मदत असल्यामुळे प्रशासनाला वेळेत पोहचता येत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
रात्री अकरा वाजेपर्यंत भवर नदीचे पाणी पातळी काहीशी कमी झाली होती. मात्र रात्री पावसाचा धोका असल्यामुळे कोणत्याही क्षणी पाणी वाढू शकते. त्यामुळे जामखेडला जाणाऱ्या वाहनधारकांनी आरणगाव फक्राबाद कुसडगाव मार्गे जामखेडला जावे असे आवाहन पाटोद्याचे माजी सरपंच गफार भाई पठाण यांनी केले आहे.
दरम्यान, माजी सरपंच गफ्फारभाई पठाण, सर्कल गव्हाणे, सिद्दीक शेख,आल्फैज मुलानी, खालेद पठाण, पांडु शिंदे पाटील, तैसीफ भाई, देवा मोरे, बिबीशेन कवादे, सोमनाथ टाफरे, दादा भाकरे केदार वाबळे सह आदी रात्री उशिरापर्यंत नदीवर तळ ठोकून होते.