भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिले भाषण, राष्ट्रपती होणे हे माझं वैयक्तिक यश नसून भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे.

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज आपला पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात शानदार शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा सोहळा आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पार पडला.

15 व्या राष्ट्रपतीपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली होती. सत्ताधारी गटाने द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विजय संपादन केला. द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय म्हटले आहे, पाहूयात.

देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल धन्यवाद, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी. सर्व देशवासीयांचे आभार.

26 जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देते.

स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल.

पुढील 25 वर्षात आपल्याला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार. या 25 वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल. जे प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते.

राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात.

ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती

आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देते की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोपरि असेल. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे

आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची 50 वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज 75 व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. 25 वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे