भाऊबीजेसाठी जामखेडला येत असलेल्या तरूणावर काळाचा घाला, मोटारसायकल अपघातात एक ठार तर एक जण जखमी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 27 ऑक्टोबर 2022 ।जामखेड- अहमदनगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे.भाऊबीजेसाठी पुण्यावरून जामखेडला निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने चिरडण्याची घटना आज घडली आहे. हा अपघात आष्टी तालुक्यातील चिंचपूर गावाजवळ घडला. यात जामखेड तालुक्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीवरील दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

young man who was coming to Jamkhed for bhau bij was killed, one injured in motorcycle accident in ashti chinchpur

जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील आदेश किसन काळे हा तरूण गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील एका कंपनीत कामाला होता.दर वर्षी प्रमाणे तो भाऊबीजेसाठी गावाकडे येत होता. बुधवारी रात्री रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आदेश काळे हा आपल्या मित्रासमवेत पुण्यावरून गावाकडे जात असतांना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला उडवण्याची घटना घडली.

या भीषण अपघातात बुलेट मोटार सायकल  एमएच १२ पीएक्स ६७२८ यावरील आदेश किसन काळे (वय ३२) रा. धनेगांव ता.जामखेड हा तरूण जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र नवनाथ मच्छिंद्र काळे (वय ३६) रा.मोशी,ता.हावेली,जि.पुणे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरूणावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत. मयत आदेश काळे याच्यावर आष्टी येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

घटनास्थळी पो.हे.काॅ.विकास राठोड यांनी पंचनामा केला असून,पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड हे करत आहेत.