World Cancer Day 2022 । मृत्यूला हरवून परतलेल्या जिद्दी युनूसची जिगरबाज गोष्ट !

World Cancer Day 2022 । जगभरात कँन्सरग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कँन्सरचे अनेक प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. कँन्सर झाला की मृत्यू आलाच ही धारणा समाजात आहे. कँन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचाराचा, जगण्याचा संघर्ष जितका वेदनादायी असतो तितकाच स्वता: रूग्ण म्हणून कँन्सरसोबत लढण्याचा संघर्ष पराकोटीचा वेदनादायी असतो. परंतू या सर्व वेदनादायी जगण्यावर मात करता येऊ शकते का ? मृत्यूला हरवता येऊ शकतं का ?  तर याचं उत्तर होय असचं आहे. 

मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मृत्यूला कसं  हरवता येऊ शकतं ? याचं थेट उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही मिनिटे द्यावे लागतील. कारण आज जागतिक कँन्सर दिवस आहे.(World Cancer Day 2022) याच दिवसाच्या निमित्ताने जामखेड टाईम्सच्या माध्यमांतून लिहीता झालाय मृत्यूला हरवून परतलेला एक जिगरबाज तरूण, ज्याचं नाव आहे युनूस सय्यद… युनूस हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्यातील रहिवासी. काय आहे यूनूसची कहाणी ? जाणून घेऊयात त्याच्याच शब्दांत..!

थोडक्यात सांगायचं झालं तर, मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्याश्या खेडे गावातून अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात शिक्षणासाठी गेलो होतो. घरी आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून पैसे कमवत होती व आम्हा चार भावंडाना सांभाळत होती. पुण्यात मिळेल ते काम करून फर्ग्युसन कॉलेजला शिकत होतो.

कोरोना महामारीने देशात पहिल्यांदा शिरकाव केला. तेव्हा लाॅकडाऊन लागल्यावर घरी गेलो. अभ्यासासोबत काम म्हणून जवळील एका कंपनीत सेक्युरिटी गार्डचं काम करत होतो. हळूहळू आजारी पडत गेलो. ताप येणे, भूक न लागणे, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, ई. लक्षण दिसू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी थोड घाबरतच सांगितले की तुम्हाला कँन्सर आहे.अगोदर तर आमचा कोणाचाच यावर विश्र्वासच बसत नव्हता.

घरात रडारडी सुरू झाली.सर्वांना वाटत होते की, आता मी थोड्याच दिवसांत मरणार आहे. या आजाराच नावपण घरात कोणाला नीट म्हणता येत नव्हतं. कारण या अगोदर कोणाला हा आजार झाला नव्हता आणि आमच्या घरात कोणी शिकलेला नव्हता की ज्याने किमान पुस्तकात तरी वाचलय कँन्सरबद्दल. त्यात डॉक्टरांनी माझ्या उपचारासाठी सांगितलेला खर्चाचा आकडा ऐकून तर सगळेच हादरून गेलेले. डाॅक्टरांनी माझ्या उपचारासाठी सांगितलेला खर्च भागवण्यासाठी घरची प्रॉपर्टी विकून तो भागेल इतकी प्राॅपर्टी पण नाहीय.

मी पण शॉक होतो कारण मी शालेय जीवनापासूनच प्रत्येक बाबतीत डाएट आणि फिटनेसची विशेष काळजी घेत होतो. योग, प्राणायाम, व्यायाम, ई. सुरू होतेच. लाईफस्टाईल खूप व्यवस्थीत होती. तेलकट, तिखट, खारट, गोड खूप कमी खात होतो. विशेष म्हणजे काडीचं व्यसन नव्हतं. पण आयुष्यात अचानक कँन्सररूपी संकटाने एँन्ट्री केली. उपचार कुठे करायचे यावर बरीच माहिती घेतली आणि मुंबई मध्ये कॅन्सरचा उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला. माझ्यासोबत फक्त माझी आई होती. आम्ही मुंबईतील एका झोपडपट्टीत 10 बाय 10 ची पत्र्याची खोली भाड्याने घेतली. कारण मुंबईत आठ नऊ महिने राहावं लागणार होतं. उपचार संपेपर्यंत तिथेच राहिलो. माझा केमोथेरपीचा उपचार सुरू झाला.

उपचार घेत असताना

डॉक्टरांनी सुरुवातीलाच अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्या ऐकून आमचा धीर खचला. ते म्हणाले की आम्ही ट्रिटमेंट पूर्ण होईपर्यंत काहीच सांगू शकत नाही. सध्या 40% जगण्याचा चान्स आहेत. मी मात्र हिम्मत हारली नाय. पैसे नसले तरी प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची आमची तयारी होती. मला त्रास इतका असायचा की व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवर  हॉस्पिटलमध्ये फिरवाव लागायचं.

मुंबईत उपचार सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला होता. एक दिवस केमो झाला अन् खोकला, ताप यायला लागला. मला तर नीट उठता बसता पण येत नव्हतं. आईने कसबसं मला पकडून ठेवलं, माझा जीव कासावीस होत होता. मला असं वाटत होत की कोणीतरी माझ्या छातीत सारखं सारखं चाकू घुसवतय अन् काढतय. मला भयंकर वेदना होत होत्या.मला डॉक्टरांनी चेक केलं अन् ICU मधे टाकले. रात्रीचे 3 वाजले होते. मला ऑक्सीजन, व्हेंटिलेटर लावण्यात आले. डॉक्टरांनी आईला सर्जिकल, मेडिकल आणायला लावले ज्याच बिल 70 हजार झालं होत. पण आईकडे पैसे नव्हते. आई पैशासाठी अक्षरशः भीक मागत होती. शेवटी डॉक्टरांनी क्रेडिट वर मेडिकल द्यायला सांगितले.

माझ्या नाकातोंडात नळ्या घातल्या गेल्या व शरीरावर सगळीकडे ECG च्या वायरी लावल्या गेल्या. माझ्या सर्व वेईन कोलाप्स झाल्या होत्या. माझ सर्व शरीर सूईने टोचून झालं पण आय.व्ही. लाईन टाकता आली नाय म्हणून गळ्याची एक आणि हाताची एक नस कापली व तीन सलाईन एकाच वेळी सुरू झाल्या.

कधीकधी वाटायचं की आता मी मरतो की काय कारण ज्या वेदना होत्या त्या शेवटच्या म्हणजे मृत्यूच्या अगोदरच्या अशा होत्या. त्या वेदना नंतर जर काय असेल तर तो म्हणजे फक्त मृत्यू. माझा जेव्हा सिटी स्कॅन काढले गेले तेव्हा माझे एक फुफुस अर्धच दिसत होतं एवढं त्यात रक्त अन् पाणी झालं होत. मला फंगल इन्फेक्शन झालं होत.

खोकला दिवसरात्र सुरूच होता. खोकलो की रक्त बाहेर पडत होतं. छाती इतकी दुखत होती की पुढचा एक महिना मी फक्त बेडवर बसून होतो. मला झोपता येत नव्हतं. माणूस दोन दिवस झोपला नाय तर पुढचे दोन दिवस खराब जातात. पण मी कितीतरी दिवस फक्त बसून होतो. झोप न झाल्यामुळे मला भ्रम व्हायचे व काही काळासाठी माझा स्मृतिभ्रंश व्हायचा. त्यातच माझी बोन मरो टेस्ट म्हणजे बायोप्सी केली. मणक्यात अन् कमरेत इंजेक्शन दिले. झोपता येत नाही म्हणून बसून होतो तर आता बसायचे पण वांदे झाले होते. संपूर्ण शरीर बधीर झालं होतं.

पाय तीनपट सुजले होते.हातापायाची कातडे गेली होती. काही दिवसांसाठी तर डोळ्याची नजर अन् आवाज पण गेला होता. हातापायाच्या नखातून रक्त यायच व प्रचंड वेदना व्हायच्या. गाल अन् ओठ आतून फाटून रक्त येत होते. पाणी पिताना पण खूप त्रास होत होता. पाच मिनिटं मला पाच वर्षांसारखे वाटत होते. जेवण बंद होतं. ओन्ली लिक्वीड डाएट वर मी जगत होतो.”फंगल इन्फेक्शन” बरं होत नाही की लगेच मला कोविड झाला. डॉक्टर व माझे मित्र खूप काळजीत पडले. त्यांना वाटले आता काही खर नाही युनूसचं. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, “अरे मला कँन्सर काहीच करू शकत नाय तर हा न दिसणारा कोरोना काय करणार?”

कोरोनाची दुसरी लाट आलेली. पुन्हा लॉकडाऊन लागलेलं. अशात मला लागणाऱ्या डाएटच्या वस्तू मिळण्यासाठी प्रचंड त्रास व्हायचा. त्या सर्वांची जमवाजमव करताना आईची खूप दमछाक व्हायची. कधीकधी आई मुंबईत हरवायची सुद्धा. लॉकडाऊनमुळे मुंबईत राहताना प्रचंड अडचणी वाढल्या.

“कोरोना मधून नीट झालो की मला डायबिटीस झाला. शुगर आवाक्यात आणण्यात एक महिना गेला. शुगर कंट्रोलमध्ये आली की कांजण्या आल्या. कांजण्या बऱ्या होण्यात पंधरा दिवस गेले.”

उपचारापूर्वीचा युनूस

मुंबईत पत्र्याच्या खोलीत राहत होतो, उन्हाळ्यात वातावरण दमट उष्ण असायचं. गरम इतकं व्हायचं की चोवीस तास घाम सुरू असायचा. शरीरातील पाण्याची पातळी खूप खाली जायची. त्यामुळे केमोचे साईड इफेक्ट्स अजून जास्त व्हायचे.

त्रास अन् वेदना इतक्या व्हायच्या की कधीकधी सहन नाही व्हायचं. दिवस कधी लवकर संपतील असं वाटायचं. वाटायचं मेलेल बरं पण आईचा चेहरा आणि तिने माझ्यासाठी घेतलेला त्रास पाहून एक नवी जगण्याची ऊर्जा मिळायची.

कोरोना काळात फक्त कोरोनाने किती तरी जण मृत्यूच्या दारी जात होते.अशा काळात मला कॅन्सर झाला होता. मला कॅन्सर मधे कावीळ,फंगल इन्फेक्शन, निमोनिया, कोरोना, डायबिटीस, कांजण्या, इत्यादी आजार झाले होते.त्याच सोबत केमो- रेडिएशन चे साईड इफेक्ट्स, लॉकडाऊन, पैशांची चणचण अन् राहण्याची अडचण, असह्य वेदना, ई. सर्व होऊनसुद्धा मी हिम्मत हारलो नाय. मी संपूर्ण ताकदीनिशी कॅन्सर शी लढलो.”

डॉक्टरांनी सांगितले होते की 40 टक्के तुझा  जगण्याचा चान्स आहे. तेव्हा मी त्यांना  म्हणालो होतो की, “सर जर एक टक्का जरी चान्स असेल ना? तर मी त्या एक टक्क्यामध्ये असेल जे वाचलेत, त्या 99 टक्क्यांमध्ये नसेल जे मरण पावलेत. हे ऐकून डॉक्टर म्हणाले, ” फिरतो तो तुम आज ही जीत गये!”

माझ्या शरीरात 86% कॅन्सर पसरला होता. आमच्याकडे ना पैसा होता, ना कोणाचं मार्गदर्शन, तरीपण मी अजून जिवंत आहे, कारण फक्त एकच की काही झालं तरी मला जगायचंय हे मी स्वतः ला सांगितले होतं. त्याच बळावर मी उपचार घेत होतो.माझ्या सोबतचे उपचार घेणारे बरेच जण आज या जगात नाहीयेत. त्याच खूप वाईट वाटतंय.

मला खूप लोकांनी मदत केली. त्यांची मला वाचवण्याची धडपड पाहून एक नवी उर्मी मिळत होती. हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या आईने माझा लहान मुलासारखा सांभाळ करून मला पुन्हा एकदा जन्म दिलाय. पण यावेळी तिला जास्त त्रास झाला. डॉक्टर, नर्स, स्टाफ, ई. सर्वांमुळे मी आज आपल्यात आहे.

काही अनोळखी व्यक्ती जे मला ओळखतही नाही त्यांनी सुद्धा मदत केली. एका जणाने तर 5 रुपये पाठवले व म्हणाला की,”दादा माझ्याकडे हे शेवटचे 5 रुपये आहेत.” अशा मदत करणाऱ्या तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. तुमचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही.

“माझ कॅन्सर विरोधातलं युद्ध अजून संपलेलं नाहीय कारण अजून मी पूर्ण जिंकलो नाहीये.”

“मागच्या वर्षी याच दिवशी मी ICU मधे  होतो. जगेल की मरेल याचा भरवसा नव्हता. समोर मृत्यू दिसत होता. श्वास बंद होत चालला होता. पण मी मृत्यूशी अखेरच्या श्वासापर्यंत लढायला तयार होतो. मागच्या वर्षीची कॅन्सर दिनाची थीम होती “I am and I will” याच शब्दांनी मला खरतर कॅन्सर विरोधात लढण्याची प्रेरणा दिली आणि आता माझा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.”

या संपूर्ण प्रवासात काही गोष्टी शिकलो.

1) जगातला सर्वात मोठा संघर्ष  म्हणजे एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे हा नसून स्वतःला जिवंत ठेवणे हा होय.

2) आपण जिवंत आहोत यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट या जगात नाही, कारण माझ्यासोबतचे बरेच जण आता नाहीत.

3) जगात तुमचं कुटुंब तुमचं सर्वस्व आहे, कारण तुमच्या वाईट काळात तेच सोबत असतात, म्हणून घरच्यांशी नीट वागा.

4) मोठ्यांचे आशिर्वाद व तुम्ही लोकांसाठी केलेले चांगलं काम याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळतो. जर तुम्ही कोणाविषयी एक चांगला विचार केला तर जगात त्याचवेळी कमीत कमी चार जण तुमच्याविषयी चांगला विचार करत असतात.

5) वेदना ही एकमेव अशी गोष्ट आहे जी सांगते तुम्ही जिवंत आहात नायतर मेलेल्या माणसाला जळताना पण त्रास होत नाय. म्हणून शारीरिक वेदना या मानसिक वेदना सहन करायला शिकवतात.

शेवटी एकच सांगायचंय, Cancer is curable if detected and treated early because there is always CAN in Cancer कॅन्सर बरा होऊ शकतो जर लवकर निदान आणि उपचार झाले तर कारण कँन्सर शब्दांतच कॅन म्हणजे एक सकारात्मक शक्यता आहे.”

जागतिक कॅन्सर दिन 2022
Close The Care Gap

लेखक – युनूस सय्यद, कँन्सर रूग्ण (7304928897)