‘अग्निवीरां’ची राबविली जातेय पारदर्शक व जलद भरती प्रक्रिया, रोज होतेय ५ हजार तरूणांची पात्रता चाचणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  अतिशय पारदर्शक, जलद व तत्परतेने सुरू असलेल्या भारतीय सैन्य दलातील ‘अग्निवीर’ भरतीत तरूणांचा उत्स्फूर्त उत्साह आहे. दररोज सुमारे ४ ते ५ हजार तरूणांची पात्रता चाचणी, मैदानी चाचणी, शारीरिक मोजमाज चाचणी, कागदपत्रे पडताळणी, बायोमॅट्रीक पडताळणी व वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे करण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेत संगणकाद्वारे स्वयंचलित गुणांक देण्यात येत असल्यामुळे कमीत कमी मानवी हस्तक्षेपाद्वारे पारदर्शक पध्दतीने भरती होत आहे.

transparent and fast recruitment process of 'Agniveer' is being implemented, eligibility test of 5000 youth is being conducted every day in rahuri

‘अग्निवीर’ भरतीच्या माध्यमातून तरूणांना राष्ट्रसेवेची संधी चालून आली आहे. शिस्त, सचोटी व प्रामाणिकपणा हे अग्निवीरांमध्ये रूजणार आहेत. या सर्व भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते इतर सर्व चाचण्यांसाठी तरूणांकडून कोणतेही शूल्क न घेता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘अग्निवीर’ भरतीत जास्तीस जास्त तरूणांनी उत्साह व उर्जेने सहभागी व्हावे. असे आवाहन भरती प्रक्रियेचे अतिरिक्त महासंचालक तथा मेजर जनरल अजय सेठी यांनी आज येथे केले.

भारतीय सैन्य दलाच्या पुणे विभागीय भरती केंद्राच्या वतीने पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यातील तरूणांसाठी राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या ‘अग्निवीर’ भरती मेळाव्याला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आज (२९ ऑगस्ट) रोजी भेट दिली. त्यावेळी मेजर जनरल अजय सेठी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

transparent and fast recruitment process of 'Agniveer' is being implemented, eligibility test of 5000 youth is being conducted every day in rahuri

मेजर जनरल अजय सेठी म्हणाले की, भारतीय संरक्षण दलाने जाहिर केलेल्या ‘अग्नीपथ’ योजनेनुसार देशभरात ‘अग्निवीर’ भरती मेळावे घेण्यात येत आहेत. पुणे संरक्षण दलाच्या भरती विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा-नगर हवेली, दमण-दीव या राज्यातील तरूणांसाठी ७ पुरूष व १ महिला असे एकूण ८ भरती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सध्या औरंगाबाद व राहूरी (अहमदनगर) येथे पुरूष मेळावे सुरू आहेत.

राहूरी भरती मेळाव्यासाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील तरूणांकडून https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ६८ हजार तरूणांनी नोंदणी केली. या सर्व तरूणांना ऑनलाईन प्रवेशपत्र वितरित करण्यात येऊन प्रत्यक्षात राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर २३ ऑगस्ट २०२२ पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज सुमारे ४ ते  ५ हजार तरूणांची भरतीसाठी पडताळणी करण्यात येत आहे. ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत ही भरती चालणार आहे. या भरतीसाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांचे ही सहकार्य लाभले आहे.

transparent and fast recruitment process of 'Agniveer' is being implemented, eligibility test of 5000 youth is being conducted every day in rahuri

यावेळी अजय सेठी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष भरती कशी राबविली जाते ते दाखविले. या भरतीत सर्वात प्रथम प्रवेशपत्र प्राप्त तरूणांची प्राथमिक पात्रता चाचणी घेतली जाते. त्यानंतर मैदानी चाचणी घेतली जाते. यामध्ये १६०० मीटर धावणे, पुलॲप्स, लांब उडी, नागमोडी चालणे या मैदानी चाचण्या घेतल्या जातात. ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची उंची, वजन व छातीचे मोजमाप केले जाते. त्यांनतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

कागदपत्र पडताळणी नंतर त्यांची बायोमॅट्रीक तपासणी केली जाते. बायोमॅट्रीक तपासणीत हाताचे ठसे, डोळ्यांचे बुबुळांचे स्कॅनिंग केले जाते. या माध्यमातून बोगस उमेदवारांची भरती रोखणे शक्य होते. बॉयोमॅट्रीक तपासणी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी हॉल तिकिट वितरित करण्यात येते.

लेखी परीक्षा साधारणत: डिसेंबर २०२२ महिन्यात घेतली जाणार आहे. या परिक्षेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष ‘अग्निवीर’ म्हणून सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी लष्कराच्या रेजिमेंटल सेंटर मध्ये पाठविण्यात येते. अशा रितीने अतिशय काटेकोर पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविली जाते.

‘अग्निवीर’च्या माध्यमातून तरूणांना राष्ट्रसेवा करण्याची संधी उपलब्ध होते. या भरती मेळाव्यात सहभागी होता न आलेल्या तरूणांनी आगामी भरती मेळाव्यासाठी https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहनही मेजर जनरल अजय सेठी यांनी केले आहे.