रोहित पवारांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, पाणंद रस्त्यांवरुन सुरु असलेली धूळफेक ही विरोधकांची पोटदुखी – पवार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेडकर  कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाही, हे अडीच वर्षांपूर्वीच दिसले आहे. त्यामुळे मागील दाराने आलेल्या कुणी कितीही रडारड केली तरी त्याचा उपयोग नाही असे सांगत पाणंद रस्त्यांवरुन सुरु असलेली धूळफेक ही विरोधकांची पोटदुखी आहे. गेली दहा वर्षे काहीही न केलेल्या कामाचा फुगा फुटल्याने नैराश्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय,असा हल्लाबोल करत आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.

Mla Rohit Pawar's strong attack on the opponents

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांसाठी निधी आणला आणि सरकारचा पैसा जपून वापरताना मुरमीकरण व माती कामातूनही रस्त्यांची गुणवत्ता राखता येते, हे दाखवून दिले. नेहमीप्रमाणे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग विरोधकांकडून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयामुळे एवढया मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामे झाली. याशिवाय इतरही अनेक कामे मी मंजूर करुन आणली असून लवकरच तीही सुरु होतील असे पवार यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे राज्यात अन्य ठिकाणी आणि कर्जत-जामखेड तालुक्यात पाणंद रस्त्यांच्या एक किलोमीटरसाठी मंजूर झालेला निधी याची तुलना केली तर राज्यात सर्वात कमी खर्चात उत्तम प्रतीचे रस्ते कर्जत-जामखेडमधील प्रशासनाने करून दाखविले, ही वस्तूस्थिती आहे. परंतु शासन निर्णयात प्रत्यक्ष असलेल्या अटी-शर्तींबाबत आणि झालेल्या कामांवर किती खर्च झाला याची शहानिशा न करता स्थानिक प्रशासनाची पिळवणूक करण्यासाठी विरोधकांकडून राजकारण सुरु आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांत दिड हजार कि.मी. पेक्षा अधिक लांबीचे पाणंद रस्ते तयार झाले आहेत. यामध्ये जामखेड तालुक्यात ८२९ कि.मी. लांबीचे सर्वाधिक रस्ते तयार झाले आहेत अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

कर्जत- जामखेड मतदारसंघातील अनेक भागात रस्त्यात अतिक्रमण आणि झुडपे अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असायचे, रस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे आमदार रोहित पवार यांनी जातीने लक्ष घालत हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सन २०२०-२१ मध्ये ‘पालकमंत्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच मविआ सरकारच्या काळातील ‘मातोश्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत शेत वहिवाटीचे रस्ते तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यात ४२३ आणि जामखेड तालुक्यात ४७६ पाणंद रस्त्यांचे मातीकाम आणि मुरमीकरण पूर्ण केले. यातून कर्जत तालुक्यात ७११.५ कि.मी. तर जामखेड तालुक्यात ८२९ कि.मी. लांबीचे रस्ते तयार झाले. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे, शेतात जाणे तसेच वाडी-वस्तीवर राहणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण या सर्वांचीच सोय होत आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.