जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून आयोजित केल्या जात असलेल्या ‘अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धा – २०२२’ च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या विजेत्यांना समारंभात पूर्वक बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले आले.
‘अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धा – २०२२’ च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्यांमध्ये मुंबईच्या साई प्रासादिक भजनी मंडळाने स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं. शिरसाई प्रासादिक भजनी मंडळ, पुणे यांनी दुसरं तर सूरताल भजनी मंडळ कोकण यांनी तिसरं पारितोषिक पटकावलं.
यंदा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातून एकूण १२०० पेक्षाही अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या भजनाचे सुरेल स्वर बारामतीच्या शारदा संकुलाच्या परिसरात सकाळपासूनच निनादत होते. आबा परकाळे, सुनील काटे, ज्ञानपर्व संस्थेचे श्री व सौ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत माऊली महाराज सावंत, श्रीधर महाराज भोसले, रामेश्वर महाराज डांगे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिलं.
‘अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धे’त कर्जत-जामखेड गटातून स्वरविहार भजनी मंडळ (कर्जत) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पवनसुत भजनी मंडळ (कर्जत) यांनी द्वितिय तर मुक्ताई भजनी मंडळ यांनी तृतिय क्रमांक पटकावला.
तर दक्षिण विभाग या गटात नाद लहरी भजनी मंडळ (तामिळनाडू) यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षिस पटकावलं. शारदा संगीत विद्यालय (गोवा) यांनी द्वितिय तर सोनाली चिखलकर (कर्नाटक) यांनी तृतिय क्रमांकाचं बक्षिस मिळवलं. अनेक भजनी मंडळांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.
आपली अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा ही केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही तेवढ्याच भक्तीभावाने जपली जात असल्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने आला. राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या समता, एकात्मता, बंधुता या बाबी अध्यात्माच्या माध्यमातून जपल्या आणि जोपासल्या जातात. त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या अनुषंगाने ‘सृजन भजन स्पर्धा’ भरवून हे महत्त्व अबाधित राखण्याचे काम आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.