Taluka Medical Officer Transfers 2023 : चमकोगिरी न करता कामाशी प्रामाणिक अशी ओळख असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ सुनिल बोराडे यांची पुण्यात बदली, 12 वर्षे बजावली जामखेडला सेवा,
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 1 जूलै 2023 : कर्तव्यदक्ष, कार्य तत्पर, स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक, मनमिळावू, सर्व जनता, राजकीय पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी व सहकाऱ्यांचे लाडके व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले जामखेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ सुनिल बोराडे यांची पुण्यात प्रशासकीय बदली झाली आहे. डाॅ बोराडे यांनी जामखेड तालुक्यात 12 वर्षे यशस्वी सेवा केली. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेली सेवा विशेष गाजली.
डॉ. सुनील विठ्ठलराव बोराडे हे जामखेड पंचायत समितीत तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. 12 वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर त्यांची पुण्यात प्रशासकीय बदली झाली आहे.प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा पुणे वैद्यकीय अधिकारी गट अ तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय बदली झाली आहे. 16 जून 2023 रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. सुनील विठ्ठलराव बोराडे हे जामखेड तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म जामखेडच्या आरोळे हॉस्पिटल या ठिकाणी झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नागेश विद्यालय जामखेड येथे झाले तर पुणे येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून 2002 साली ते शासकीय सेवेमध्ये रुजू झाले होते. त्यांनी अकोले, माणिकदौंडी, अरणगाव, कर्जत याठिकाणी सेवा दिली. जामखेड तालुका आरोग्य अधिकारी म्हणून ते सलग 12 वर्षे जामखेड तालुक्यात कार्यरत होते. त्यांनी अतिशय तत्परतेने आपली सेवा बजावली.
डाॅ सुनिल बोराडे यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात नेहमी सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये 2015 सालचा अहमदनगर जिल्हा परिषदेचा आदर्श वैद्यकीय अधिकारी 2016 साली आदर्श तालुका आरोग्य अधिकारी व आदर्श अधिकारी आय एस ओ मानांकन तसेच 2017 साली आदर्श प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती जामखेड, नवकार फाउंडेशनचा आदर्श आरोग्य अधिकारी,उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड असे एकूण 14 शासकीय, निम शासकीय व खाजगी संस्थामार्फत त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पात जगातील 89 देशातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. त्यांचे प्रशिक्षक म्हणून डाॅ सुनिल बोराडे हे गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत होते. जामखेड तालुक्यात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू , चिकन गुणिया साथरोग अटोक्यात आणण्यासाठी त्यांनी आखलेल्या योजना यशस्वी ठरल्या. त्यांनी सर्व शासकीय योजना जनतेपर्यंत विनातक्रार पोहोचविल्या. कुटुंब कल्याण, क्षयरोग व कुष्ठरोग विषयक त्यांनी केलेले कामकाज उल्लेखनीय ठरले.
जामखेड तालुक्यातील तळागाळातील जनतेपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे कामी तालुक्यामध्ये नवीन दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच नवीन उपकेंद्र निर्मिती तसेच दोन शहरी दवाखाने व 22 आरोग्यवर्धिनी केंद्र निर्मितीमध्ये डाॅ बोराडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. कोरोना साथ रोग कालावधीमध्ये व्यवस्थित नियोजन करून रुग्णसेवा देण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे.
चमकोगिरी न करता आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला अधिकारी अशी डाॅ सुनिल बोराडे यांची आरोग्य वर्तुळात ओळख होती. कोणताही गाजावाजा न करता, रूबाब न करता जनतेच्या आरोग्य सेवेसाठी 12 वर्षे महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले. त्यांची बदली झाल्यामुळे आपल्या हक्काचा आपला माणूस दुर गेला ही भावना जनतेत निर्माण झाली आहे.