जामखेड : बीडीओ प्रकाश पोळ यांचा मोठा निर्णय, जामखेड पंचायत समितीच्या सर्व विभागांसाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी, काय आहे या आदेशात? सविस्तर वाचा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख: १ जूलै २०२३ : नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात ओळख असलेल्या जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांची शासकीय अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. याशिवाय वेळेचीही बचत होणार आहे.
जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात चर्चेत असतात. त्यांनी जामखेडला रूजू झाल्यापासून अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अनेक शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत जाताना दिसत आहेत. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी ३० जून २०२३ रोजी आणखीन एक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गटविकास अधिकारी गाव भेटीवर आल्यानंतर होणाऱ्या सत्कार समारंभाला फाटा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेश त्यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागांना काढले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागात होणारे कार्यक्रम आटोपशीर अन कमी वेळेत पुर्ण होतील. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी घेतलेल्या या निर्णयाचे जामखेडकरांमधून स्वागत होत आहे.
जामखेड टाइम्सला माहिती देताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, गटविकास अधिकारी म्हणून मी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मी अनेक संस्थांना, कार्यालयांना भेटी देतो तेव्हा, बीडीओच्या सत्कार होतो, सत्काराच्या नियोजनासाठी संबंधित संस्थेची, कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ होताना मी नेहमी पाहतो, सत्कारासाठी शाल, श्रीफळ, फेटा, हार तुरे या अनावश्यक गोष्टींचा यात वापर होतो, त्यासाठी संबंधित संस्थेचे पैसेही खर्च होतात, शिवाय सत्काराच्या कार्यक्रमांमुळे वेळेचाही अपव्यय होतो. परंतू सत्कार घेण्याची आपली इच्छा नसतानाही संबंधित संस्थेने पूर्वतयारी केल्यामुळे आपल्याला सत्कार स्वीकारावा लागतो, त्यामुळे आता पंचायत समितीच्या वतीने एक आदेशच बनवलाय, ज्याच्यामुळे संबंधित संस्था असो अथवा कार्यालय त्यांना सत्कारासाठी धावपळ करण्याची गरजच पडणार नाही.
पुढे बोलताना प्रकाश पोळ म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी जे साहित्य आणले जाते त्यासाठी संबंधित संस्था, कार्यालयांचे शंभर ते पाचशे रूपये सहज खर्च होतात, पण तो खर्च वाया जातो. परंतू आमचा काहीच सत्कार करू नका, शब्द सुमनांनी स्वागत करा, त्यातून पैसा आणि वेळ वाचणार आहे. आमच्या सत्कारासाठी संबंधितांना जो खर्च करायचाय तो त्यांनी त्यादिवशी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल, पोषक आहार असेल, शैक्षणिक साहित्य असेल याचे वाटप करावं, अशी त्यामागची भूमिका आहे. या निर्णयाची सर्व विभागांनी अंमलबजावणी करावी यासाठी आदेश जारी केला आहे, असे पोळ म्हणाले.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागांना जारी केलेल्या आदेशात नेमकं काय म्हटलयं? पाहूयात..
प्रति,
१. तालुका आरोग्य अधिकारी जामखेड / वैदयकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र खर्डा / अरणगांव / नान्नज
२. पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स जामखेड / पशुधन विकास अधिकारी प.वै.द खर्डा / नान्नज / जामखेड
३. बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.बा.वि. से.यो प्रकल्प जामखेड
४. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड
५. समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र
६. ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक (सर्व) (सर्व) ता. जामखेड
विषय : समारंभ, शाल, श्रीफळ, हार, गुच्छ या वस्तुने न करता शब्द सुमनाने करणेबाबत….
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविणेत येते की, गट विकास अधिकारी हे गाव पातळीवरील जिल्हा परिषद प्रा. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, तसेच ग्रामपंचायत कार्यालयांस भेंट देऊन, विविध विकास कामांची पाहणी करत असतात. यावेळी गट विकास अधिकारी यांचा सत्कार शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन केला जातो. सत्कार करणेसाठी आवश्यक साहित्य आणणेसाठी विनाकारण पैसा व वेळ खर्च होतो. सत्कार केल्यानंतर शाल, श्रीफळ, हार, गुच्छ याचा कोणत्याही प्रकारचा पुन्हा फायदा होत नाही व सदर वस्तु या वाया जातात.
तरी सर्व विभागप्रमुख व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचित करणेत येते की, गट विकास अधिकारी याचा गाव पातळीवरील भेटीच्या वेळेस सत्कार / स्वागत करतांना शाल, श्रीफळ, हार, गुच्छ या वस्तुने न करता शब्द सुमनाने स्वागत करणेत यावा. तसेच या बाबींसाठी लागणारा पैशाचा विनिपयोग शालेय विदयार्थ्याना / अंगणवाडी बालके शालेय साहित्य (वही, पेन,पुस्तके,) चांगल्या दर्जाचा पोष्टीक खाऊ तसेच आरोग्य विषयक लागणा-या सोई-सुविधा यासाठी करणेत यावा.
याबाबी आपल्या विभागांतर्गत केल्यानंतर या बाबतचा चांगल्या प्रकारचा संदेश समाजामध्ये जाईल. तरी सर्व विभागप्रमुख यांनी आपले अधिनस्त जिल्हा परिषद प्रा. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने यांना याबाबत आपले स्तरावरून आदेश देणेत यावे. ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांनी याबाबतची योग्य ती नोंद घेवुन ग्रामपंचायत स्तरावर याबाबीचे प्रबोधन करणेत यावे, असे या आदेशात म्हटले आहे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचे शासकीय कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे. या उपक्रमाची येत्या सोमवारपासून जामखेड तालुक्यात अंमलबजावणी सुरु होणार आहे. या निर्णयाचे जामखेडकरांमधून स्वागत होत आहे.