foreign liquor seized । १ कोटी २१ लाख ५० हजार रूपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त, पारनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  –  गोवा (goa) राज्यात विक्रीसाठी पाठविला जाणारा १ कोटी २१ लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा (Goa, foreign liquor) जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे व अहमदनगरच्या भरारी पथकांनी पार पाडली.पारनेर तालुक्यातील अहमदनगर-पुणे रस्त्यावरील पळवे शिवारात ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक- नारायणगांव व तळेगांव दाभाडे, निरीक्षक- भरारी पथक क्र.१ अहमदनगर यांना पारनेर तालुक्यातील अहमदनगर- पुणे रस्त्यावरील हॉटेल गारवा समोर पळवे शिवारात गोवा राज्यात विक्रीसाठी पाठविला जात असलेला विदेशी मद्यासह भरलेला कंटेनर उभा आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार,१६ जून रोजी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पळवे शिवारात धाड टाकली, त्यावेळी या पथकाला विदेशी मद्यासह भरलेला कंटेनर उभा असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी भरारी पथकाने चालक प्रदिप परमेश्वर पवार (मोहोळ, जि. सोलापूर) यास कंटेनरसह ताब्यात घेतले. या कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे १५५० बॉक्सेस आढळून आले.या गुन्ह्यात प्रथमदर्शनी बापू भोसले (खवनी, ता.मोहोळ, जि.सोलापूर) व निखिल कोकाटे (रा.तांबोळी, ता.मोहोळ, जि.सोलापूर) यांचा सहभाग दिसून आला म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्या १९४९ च्या विविध कलमान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बी.टी.घोरतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे अधीक्षक सी.बी.राजपूत, नारायणगांवचे दुय्यम निरीक्षक महिपाल धोका, तळेगांव दाभाडे दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, निरीक्षक अे.बी.बनकर, आर.पी.दांगट, संजय विधाटे, तुळशीराम करंजुले, जवान सर्वरी, निहाल उके, सुरज पवार एन.आर.ठोकळ, शुभांगी आठरे यांनी सदर कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक अे.बी.बनकर करत आहेत. अशी माहिती  निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १,अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.