मिशन 45 : आक्रमक रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा। सत्तार शेख। भाजपने माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (mla rohit pawar) आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी भाजपच्या मिशन 45 वरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Rohit Pawar’s aggressive attack on Devendra Fadnavis from Mission 45)

भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ न शकलेल्या 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 45 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात विजय मिळवायचाच या इराद्याने भाजपने व्यूहरचना आखली आहे. त्यादृष्टीने भाजपने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या खांद्यावर वेगवेेगळ्या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे यांची नियुक्ती केली आहे . राम शिंदे यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

10th result 2022 : आज दहावीचा निकाल : दहावीचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राम शिंदेंना विधान परिषदेची संधी दिली आहे.त्यांना तिकडेच राहू द्या. राम शिंदेना 2024 ला माझ्याविरोधात विधानसभेची उमेदवारी द्या, तेव्हा बघा लोकचं काय तो निर्णय घेणार आहेत. तेव्हा कोणाला काय संधी दिली, हे ते ठरवत असतील, पण लोकं काय करणार हे तुम्ही ठरवत नसतात, तुम्ही कितीही ताकद लावा, लोकांच्या मनामध्ये काय हेच मतपेट्यांच्या माध्यमांतून आपल्या सर्वांसमोर येईल असा इशारा रोहित पवार यांनी देवेंद्र फडवणीस यांना दिला आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे, कोणी कितीही वल्गना केल्या तरी आम्ही आमचे उमेदवार निवडून आणणार आहोत असेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.