खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्याची धडक कारवाई केली. या कारवाईत आठ गावठी पिस्तूल आणि 10 काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. मोठा शस्त्रसाठा हस्तगत झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ( Sensational, Eight village pistols, 10 live cartridges, three Arrested, LCB raids in Ahmednagar district shrirampur )

याबाबत सविस्तर असे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्रसाठा विक्री हाेणार असल्याची माहिती अहमदनगर एलसीबीला खबऱ्यामार्फत मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्रीरामपुर येथे संबंधित बातमीची खातरजमा करण्यासाठी सापळा लावला होता.

श्रीरामपूरमधील हॉटेल राधिकाच्या पार्किंगमध्ये दाढी वाढलेले तीन व्यक्ती संशयरित्या टेहळणी करत हाेते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी खात्री केली. त्यानंतर तिघांभाेवती घेराव घातला. पाेलिसांनी घेराव घातल्याची चाहूल लागताच हे तिघे पळून जावू लागले. यानंतर पळापळी झाली. पाेलिसांनी शिताफीने पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले.

विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले आठ गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे हस्तगत करत पोलिसांनी राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२) आणि अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय २२, रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड क्रमांक तीन, ता. श्रीरामपूर) या तिघांना अटक केली आहे अशी माहिती पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक अनिल कटके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

या कारवाईच्या पथकात सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फाैजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पाेलिस कर्मचारी बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पाेलिस नाईक भीमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, मयुर गायकवाड, सागर ससाणे आणि चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.