सांगली : सांगली जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत चौघा मायलेकींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.तलावाजवळ काही कपडे आणि कपडे धुण्याची साबण आढळून आले आहे. यावरून त्या कपडे धुण्यासाठी तलावाजवळ गेल्या असाव्यात असं सांगितलं जात आहे.
सांगली जिल्ह्यातील बिळूर गावातील सुनिता माळी ह्या कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या, मात्र त्या घरी परतल्याच नाहीत, रविवारी रात्री चौघांचे मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले. अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुनिता माळी (वय 32), अमृता माळी (वय 13), अश्विनी माळी (वय 10), ऐश्वर्या माळी (वय 7) या चौघा मायलेकींचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याची घटना सांगली जिल्ह्यातील बिळूर या जत तालुक्यातील गावात घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चौघींचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जतच्या ग्रामीण रुग्णालयात चौघा मायलेकींचे मृतदेह आणण्यात आले. हा घात आहे की अपघात या दृष्टिकोनातून पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.