Samana Editorial : मोगल, औरंगजेब, पाकिस्तान, गारदी अश्या तिखट शब्दांचे बाण कोणाच्या दिशेने ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Samana Editorial । ठाकरे आणि शिंदे गटाला कोणते नाव आणि चिन्ह मिळणार याचा फैसला निवडणूक आयोगाकडून आज केला जाणार आहे, दोन्ही गटांनी समान नावावर दावा केल्यास पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे काल जनतेशी संवाद अनेक गोष्टींवर भाष्य केले. आजच्या सामना शिवसेनेची काय भूमिका असणार ? याकडे सर्वांचेच लक्ष होते. शिवसेनेवर घातलेल्या ‘गारदी’ घावाने शिंदेंइतकाच पाकिस्तान खूश असेल, असा थेट हल्लाबोल सामनातून (Samana Editorial) करण्यात आला आहे.

samana editorial, 10 October 2022, shiv sena news, Uddhav Thackeray latest news, Eknath Shinde latest news

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलयं पाहुयात..!

महाराष्ट्रावर विजेचा लोळ कोसळावा आणि सर्व काही क्षणात नष्ट व्हावे, असा क्रूर निर्णय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिला आहे. गद्दार मिंधे गटाने आक्षेप घेतला म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचे नामोनिशाण खतम करण्याचा अघोरी प्रकार झाला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही काढला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय देऊन महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधकार निर्माण केला.

शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल. गेल्या छपन्न वर्षांत देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यास जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले.

या अवलादीपुढे औरंगजेबाचा दुष्टपणाही कमी पडेल.

त्याकामी दिल्लीने त्या गारद्यांना साथ दिली. शिवसेनेवर असे घाव घालून या गारद्यांनी महाराष्ट्र पांगळा केला, मराठी माणूस कमजोर केला आणि हिंदुत्व रसातळाला नेले असेच म्हणावे लागेल. एक मुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे या सौदेबाजीत महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या या अवलादीपुढे औरंगजेबाचा दुष्टपणाही कमी पडेल. भारतीय जनता पक्ष या सगळय़ाचा सूत्रधार आहे.

शिवसेना फोडण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर यश मिळाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेला जमीन दाखवू असे अमित शहा सांगत होते. शिवसेना राहिलीच नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. या सगळय़ांना शिवसेनेशी मैदानात लढता येत नव्हते म्हणून त्यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या पाठीवर गोळी झाडली.

शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली

बिहारच्या लोकजनशक्ती पार्टीत जेव्हा फूट पडली होती आणि त्यांचा वाद जेव्हा निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला तेव्हा याच पद्धतीने निकाल दिला गेला होता. अर्थात लोकजनशक्ती पार्टी आणि शिवसेनेत फरक आहे. शिवसेना हा न विझणारा वणवा आहे, हे माहीत असल्यानेच काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली. त्यातूनच कोणीतरी एक ठाण्याचा गारदी उठला, त्या गारद्याच्या हातात भाजपने त्यांची तलवार दिली व शिवसेनेवर वार करायला लावला.

पैशांचा व केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर याकामी झाला आणि निवडणूक आयोगानेही गारद्यांच्या बापांना हवा तसाच निर्णय दिला. वास्तविक मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची. त्या शिवसेनेचे नेतृत्व घटनेनुसार आमच्याकडे आले. चाळीस आमदार, बारा खासदार फितूर झाले, पण मूळ पक्ष जागेवर असताना, लाखो शिवसैनिक पक्षाचे सदस्य असताना निवडणूक आयोगाने राजकीय मिठास जागल्याप्रमाणे निर्णय द्यावा हा सरळ सरळ अन्याय आहे.

एक धगधगता विचार मारण्याची ही कपटखेळी आहे. निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांनी स्वतंत्र बाण्याने काम करावे, दबावाखाली येऊ नये, पण या वाजवी अपेक्षेच्या विपरीत घडत आहे. ‘धनुष्यबाण’ निशाणी शिवसेनेस मिळणार नाही असे शिंदे व त्यांचे गारदी सांगत होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्वच राहू नये यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी केली.

कुठे फेडाल हे पाप!

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक घाव आणि आघात पचवले. महाराष्ट्रावरचा प्रत्येक घाव शिवसेनेने आपल्या छातीवर झेलला. हजारो शिवसैनिकांनी त्यासाठी बलिदाने दिली, रक्त सांडले. त्या रक्त आणि त्यागातून बहरलेल्या शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारीत विकट हास्य केले असेल. शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही!

महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेले 105 हुतात्मे, शिवसेनेसाठी मरण पत्करलेले असंख्य त्यागी वीरपुरुष आकाशातून या गारद्यास शाप आणि शापच देत असतील. निवडणूक आयोगाने शिवसेनेवर घातलेल्या ‘गारदी’ घावाने शिंदेंइतकाच पाकिस्तान खूश असेल.

महाराष्ट्राचा प्रत्येक दुष्मन आनंदी असेल. मात्र स्वतःच्या आयुष्याचे शिंपण करून ‘शिवसेना’ नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज ज्या वेदना, दुःख होत असेल त्याचे काय? हे पाप ज्यांनी केले आहे ते शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल.

निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!