Yashwantrao Chavan Mukt Colony Scheme । धनगर समाजातील कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Yashwantrao Chavan Mukt Colony Scheme । यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी आणि शर्ती लागू करून धनगर समाजातील पात्र व वंचित कुटुंबासाठी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जामखेड पंचायत समितीच्या माध्यमांतून 6 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी हाती घेण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवली जाणार आहे. यासाठी जामखेड तालुक्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पात्रता अटी
- ही योजना फक्त धनगर समाजासाठी (भटक्या जमाती क प्रवर्गासाठी) लागू राहील.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
- लाभार्थी बेघर असावा अथवा झोपडी/ कच्चे घर /पालामध्ये राहणारा असावा.
- सदर लाभार्थ्याचा समावेश पंतप्रधान आवास योजनेतील ड यादीमध्ये नसावा.
- लाभार्थ्याकडे 269 चौरस फूट घराचे बांधकाम करता येईल इतपत स्वतःची जागा असावी.
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज व इतर कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करावी. अर्जाचा नमुना ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती घरकुल कक्षामध्ये मिळेल. प्रथम अर्ज देणाऱ्यास प्राधान्य राहील.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचा विहित नमुन्यातील अर्ज
- जातीचा दाखला (NTC प्रवर्ग)
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जास्तीत जास्त 1. 20 लक्ष रु वार्षिक
- जागेचा उतारा
- राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्याची पासबुक प्रत
- MREGS जॉबकार्ड
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी 1.20 लक्ष, MREGS अंतर्गत बांधकाम मंजुरी 23040 रु आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करणेसाठी 12000 रु असे एकूण 155040 रु अनुदान देण्यात येईल. लाभार्थ्यांना किमान 269 चौ.फु. बांधकाम करावे लागेल. घरकुल व MREGS चा निधी बांधकाम टप्प्यानुसार 4 हप्त्यात देण्यात येईल. तेव्हा इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ग्रामपंचायतला अर्ज सादर करावे असे अवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.