गोरगरीब शेतकऱ्यांचा आधारवड हरपला : सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात अनंतात विलीन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  सहकार क्षेत्रातील धुरंधर मुत्सद्दी, निडर, संवेदनशील राजकारणी, शेतकऱ्यांचे कैवारी अशी ख्याती असलेले अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा सहकारमहर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात यांच्यावर बुधवारी रात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात जामखेड येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sahakar Maharshi Jagannath Tatya Ralebhaat merges into infinity

अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा सहकारमहर्षी जगन्नाथ ( तात्या ) राळेभात हे काही दिवसांपासुन आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पुण्याहून दिवंगत राळेभात यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी सहा वाजता जामखेड येथील राहत्या घरी आणण्यात आले.

दिवंगत तात्यांच्या अंत्यदर्शनासाठी जामखेड तालुक्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते, नेते, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लाडक्या तात्यांना पाहताच कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. दीड तास अंत्यदर्शन सुरु होते. त्यानंतर बीड रोड – बीड काॅर्नर –  जयहिंद चौक – खर्डा चौक- तपनेश्वर रोड – अमरधाम या मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

दिवंगत जगन्नाथ (तात्या) राळेभात यांचे थोरले चिरंजीव सुधीर राळेभात यांनी तात्यांना मुखाग्नी दिला. धाकटे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. कुटुंबीय नातेवाईकांसह अप्तेष्ठांनी अश्रु नयनांनी तात्यांना अखेरचा निरोप दिला.

दरम्यान यावेळी मंत्री आमदार राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब पाटील वर्पे, संचालक अंबादास पिसाळ, सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर आबा राळेभात, तात्यांचे जीवलग मित्र कल्लू चाचा, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, प्रवीण घुले, दादासाहेब सोनमाळी, नितीन सपकाळ, सूर्यकांत मोरे, संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, रवि सुरवसे, पांडुरंग सोले पाटील, अँड.बंकटराव बारवकर,  विजयसिंह गोलेकर, शहाजीराजे भोसले, प्राचार्य श्रीकांत होशिंग, शितल शिंगवी सह आदींनी श्रद्धांजली वाहिली आणि तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत जगन्नाथ तात्या राळेभात हे अहमदनगर जिल्हा बँकेचे पंधरा वर्षे संचालक होते. जामखेड तालुक्यातील सेवा संस्थांवर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. अनेक सहकारी संस्थांवर राळेभात यांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांचे थोरले चिरंजीव सुधीर राळेभात हे बाजार समितीच्या तर धाकटे चिरंजीव अमोल राळेभात जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. जगन्नाथ तात्यांना जामखेड तालुक्यात ‘मिस्तरी’ या नावाने देखील ओळखले जात होते.तर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना ‘तात्या’ या नावाने ओळखले जायचे. कट्टर विखे समर्थक म्हणून तात्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख होती.जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या काळात तात्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य कधीच विसरता न येण्यासारखे आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी बँक कर्जाच्या माध्यमातून मदत करुन कन्यादान करणारं नेतृत्व हारपल्याने जामखेड तालुक्यातील शेतकरी पोरका झाला आहे.