जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा येथील जेष्ठ नेते मारूती बाबुराव शिंदे यांचे आज निधन झाले. सरपंच प्रशांत शिंदे यांचे ते वडील होते. निस्वार्थी, शांत आणि संयमी स्वभावाचे संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जायचे. संघर्षातून उभे राहिलेल्या या नेतृत्वाने गावच्या विकासासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली होती. मारूती शिंदे यांच्या अकाली जाण्याने जवळा गाव संघर्षशील नेतृत्वाला कायमचे मुकले. शिंदे यांच्या निधनामुळे जवळा आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
जवळा गावच्या राजकारणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या भाऊसाहेबांचा, जवळा गावच्या जडणघडणीत आणि विकास कामात मोठे योगदान राहिलेले आहे. गावच्या विकासासाठी राजकारण,पक्ष बाजूला ठेवून, भाऊसाहेबांनी प्रामाणिक काम करणा-यांना कायम साथ दिली.रयत शिक्षण संस्थेत काम करतानाच,भाऊसाहेबांचे सामाजिक कामात महत्वाचे योगदान राहिले.
भाऊसाहेबांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात वर्ग खोल्या बांधकाम करण्याबरोबरच, १२ वी पर्यंत उच्च माध्यमिक विद्यालय सूरू करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.समाजातील गोरगरीब मुलींचे विवाह लावून,त्यांचा संसार उभा करण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा राहिला. सन १९९६ साली ग्रामदैवत श्री जवळेश्वर मंदिराचे शिखर बांधकाम करण्यासाठी भाऊसाहेबांनी पुढाकार घेतला.
जवळा ग्रामपंचायत, जवळा सेवा सोसायटी या संस्थावर काम करताना भाऊसाहेबांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. भाऊसाहेबांचा राजकीय प्रवास तत्कालिन आमदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत भाजपामधून झाला. पुढे काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना भाऊसाहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सर्वांना बरोबर घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे राहिले.