जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, असा आहे निवडणूक कार्यक्रम, इच्छुक लागले तयारीला, राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष पुन्हा भडकणार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यात आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष तापलेला आहे. आता हा संघर्ष जामखेड बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकच भडकताना दिसणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांचा जोरदार कस लागणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पुढील काही महिने जामखेड तालुक्यात राजकीय धुराळा उडताना दिसणार आहे.

Election program, Jamkhed market committee election announced, aspirants started preparing, Ram Shinde vs Rohit Pawar conflict will flare up again,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छूक उमेदवार आणि त्यांचे समर्थक आधीच गॅसवर होते. मात्र जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व राजकीय पक्षांमधील नेते, कार्यकर्ते आणि समर्थक पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. जामखेड तालुक्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. अगामी बाजार समिती निवडणुकीत पक्षांतराची लाट अधिक तीव्र होणार असल्याचे बोलले जात आहे. यात कोण- कोणाला सुरूंग लावणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीत पूर्वीप्रमाणेच सोसायटी संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य मतदार असणार आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. बाजार समितीवर माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांच्या गटाची सत्ता होती. बाजार समितीची मुदत संपली होती, परंतू कोरोना आणि इतर कारणांनी निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे बाजार समितीचा कारभार प्रशासकामार्फत सुरु होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतरे घडली. राजकीय गणिते बदलली. बाजार समितीवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तर आमदार रोहित पवार यांना बाजार समितीवर पहिल्यांदा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. दोन्ही नेत्यांसाठी यंदा होणारी बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत मिळणारे यश अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पवार विरुद्ध शिंदे हा सामना पुन्हा एकदा राज्यात गाजणार असेच संकेत मिळत आहेत.

राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे. दोन्ही पक्ष युती – आघाडी करून निवडणूक लढवणार की स्वतंत्र मैदानात उतरून आपले राजकीय बळ तपासणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

यंदा होणारी निवडणूक निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणारी ठरणार आहे. या निवडणुकीत पवार आणि शिंदे या दोन्ही नेत्यांना निर्णायक डावपेच टाकावे लागणार आहेत. अभ्यासू कार्यकर्ते निवडणूकीच्या मैदानात उतरावे लागतील. आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी दोन्ही आमदार या निवडणूकीत मोठी ताकद पणाला लावताना दिसणार आहेत. त्यामुळे यंदा बाजार समितीत चुरशीचा सामना रंगताना दिसणार आहे.

जामखेड बाजार समिती निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे

 • दि. 23 डिसेंबर 2022 – निवडणूक निर्णय आधिकरी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
 • दि. 23 ते 29 डिसेंबर 2022 – नामनिर्देशन भरणे
 • दि. 30 डिसेंबर 2022 – नामानिर्देश पत्रांची छाननी
 • दि. 2 जानेवारी 2023– वैध नामनिर्देश पत्रे प्रसिद्धी
 • दि. 16 जानेवारी 2023 – उमेदवारी अर्ज माघार
 • दि. 17 जानेवारी 2023 – उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप
 • दि. 29 जानेवारी 2023 – मतदान
 • दि.30 जानेवारी 2023 – मतमोजणी

मतदार यादी कार्यक्रम

 • दि. 7 ते 27 सप्टेंबर 2022 – जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागविणे.
 • दि. 3 ऑक्टोबर 2022 – प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे.
 • दि. 3 ते 31 ऑक्टोबर 2022 – बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदारयादी तयार करणे.
 • दि . 1 नोव्हेंबर 2022 – बाजार समिती सचिवाने प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे.
 • दि. 14 नोव्हेंबर 2022 – जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदारयादी प्रसिद्ध करणे.
 • दि. 14 ते 23 नोहेंबर 2022 – प्रारूप मतदार यादीवर हरकती, आक्षेप मागविणे.
 • दि. 23 ते 2 डिसेंबर 2022 – जिल्हा निवडणूक अधिकारी हरकतीवर निर्णय घेतील.
 • दि . 7 डिसेंबर 2022 – निवडणूक अधिकारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करतील.