मोठी बातमी : कर्जत-जामखेड मधील 44 हजार शेतकऱ्यांना महायुती सरकारचा दिलासा, 31 कोटी 95 लाख रूपयांचे अनुदान प्राप्त, आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । “नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार प्रा. राम शिंदे हे पुन्हा एकदा धावून आले. आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ९५ लाख रूपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकसान भरपाईचे अनुदान जारी केल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.”

मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदरची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

जामखेड तालुक्यातील ५३ गावातील १५ हजार ४४४ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख तर कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार २८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख असे एकुण ३१ कोटी ९५ लाखांचे नुकसान भरपाई अनुदान मंजुर झाले आहे. मंजुर अनुदानाचे वाटप सुरु झाल्याने कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Relief to 44 thousand farmers in Karjat-Jamkhed, compensation subsidy of 31 crore 95 lakhs received by Mahayuti government, due to follow-up of MLA Ram Shinde, distressed farmers got relief

४४ हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

मागील वर्षी कर्जत जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला होता.यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. नुकसानीचे पंचनामे होऊन वर्ष लोटत आले होते. त्यातच यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. त्यानुसार मतदारसंघातील ४४ हजार शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ९५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.

जामखेड तालुक्यासाठी ८ कोटी ७० लाखांचे अनुदान प्राप्त

जामखेड तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे २३ हजार ६५६ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली असल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार तालुका प्रशासनाने १३ हजार ९९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान भरपाईपोटी २२ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी केली होती. परंतु २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार हेक्टरी १३ हजार ऐवजी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला होता. ६ हजार ८०० रुपये हेक्टरी प्रमाणे १९ हजार ५६० शेतकऱ्यांना ११ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान जामखेड तालुक्यासाठी शासनाने मंजूर केले आहे. यातील ८ कोटी ७० लाख रूपये जमा झाले आहे.

त्यातील काही शेतकऱ्यांचे आधार मधील नाव व बँकेच्या नावात बदल किंवा एकच आधार क्रमांक विविध शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला आहे. त्यामुळे असे २६२ शेतकरी बाद झाले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांचे बँक खाते चुकीचे किंवा बँकेच्या आय एफ एस सी कोड चुकीचा असेल तर या शेतकऱ्यांचे खाते दुरुस्त करण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयात दुरुस्तीची काम सुरु आहे. त्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे चुकीची माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार नंबरसह , खाते दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहेत.

कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांनी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जामखेड तालुक्यातील ५३ गावातील १५ हजार ४४४ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख तर कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार २८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख असे एकुण ३१ कोटी ९५ लाखांची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. मंजुर नुकसान भरपाईचे वाटप सुरु झाल्याने कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

जामखेड तालुक्याचे 2 कोटी 30 लाख रूपयांचे अनुदान येणे बाकी

“१९ हजार ५६० शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांच्या नुकसान भरपाई अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ८ कोटी ७० लाख एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.५३ गावांमधील शेतकऱ्यांची आधार संलग्ननिहाय पडताळणी व आधार प्रमाणिकरण पूर्ण होताच बँक खात्यातून अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांनाच्या खात्यात वर्ग करण्यात होणार आहे. अजूनही जामखेड तालुक्यातील 34 गावांमधील 4000 शेतकऱ्यांचे 2 कोटी 30 लाख रूपयांचे अनुदान येणे बाकी आहे. तेही अनुदान लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रकांत यांनी दिली.

“कर्जत जामखेडमधील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न गेल्या एक वर्षापासुन रखडला होता. सदरची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी शासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. मतदारसंघातील ४४ हजार शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. तसेच त्यांनी नुकसान भरपाईचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकारचे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार !”

पै. शरद (दादा) कार्ले सभापती – जामखेड कृषि उत्पन्न बाजार समिती.

कर्जत तालुक्यासाठी २३ कोटी २५ लाख रूपयांचे अनुदान प्राप्त

कर्जत तालुक्यात सुध्दा माहे सप्टेंबर- ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुका प्रशासनाने ३५ हजार ८४५  शेतकऱ्यांसाठी २७ कोटी २२ लाख ५४ हजार ५७९ इतक्या अनुदानाची मागणी केली होती. त्यापैकी २३ कोटी २५ लाख ६८ हजार ६७१ रूपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. ९८ गावांमधील २९ हजार २८० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार आहे. तर ऊर्वरीत ३ कोटी ९६ लाख ८५ हजार ९०६ रूपयांचे अनुदान लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

“यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचे प्रमाण कमी आहे. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. शेतकरी बांधव संकटात आहेत. अश्या परिस्थितीत सरकारने मागील वर्षीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार प्रा.राम शिंदे धावून आले. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून संकटग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत अनुदान प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रा राम शिंदे व राज्य सरकारचे मनापासून आभार!”

काकासाहेब तापकीर सभापती, कर्जत बाजार समिती