वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाखांची आर्थिक मदत, शासन निर्णय जारी, मदतीचे वितरण कसे होणार? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड/वानर यांचे दर्शन रोज कुठे ना कुठे घडते. वन्यप्राण्यांचा नागरी वस्त्यांमधील वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या आहेत.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना सरकारकडून भरघोस मदत दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सरकारने जारी केला आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाख रुपये तसेच कायम अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार, गंभीररित्या जखमींना ५ लाख रुपये तर किरकोळ जखमींना औषधोपचारासाठी खर्च देणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी केला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली.

राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव-वन्यजीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते. याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

25 lakhs financial aid will be given to heirs of those killed in wild animal attacks, government decision issued, how will aid be distributed? 
Mahsul v Van vibhag GR Know in detail

यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार आहे. दिनांक ०३ ऑगस्ट, २०२३ रोजी हा निर्णय निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणीही होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपये आर्थिक सहकार्य करण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे. मात्र, खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये ५० हजार प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड/वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात.

जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तीला खासगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी रुपये १० लाख देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये १० लाख पाच वर्षांकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये १० वर्षाकरिता मुदत ठेवमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.