जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Pune Rain Update। सोमवारी रात्री पुणे शहराला पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. दोन तासापेक्षा अधिक काळ पावसाने तुफान बॅटिंग केली. विजेट कडकडाटासह झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. पुण्यात पावसाने माजवलेला हाहाकार धडकी भरवणारा ठरला आहे.
विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. पुणे शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या दोन तासांमध्ये 90 मिलिमीटर पाऊस शिवाजीनगरमध्ये नोंदला गेला.
पुण्यात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण होते. उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे हवेतील उकाडाही वाढल्याचे जाणवत होते. रात्री साडेनऊ वाजल्यानंतर शहरातील अचानक तुफान पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, काही वेळेतच रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागले.
रात्री साडे दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. रात्र असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली होती. भांडारकर रस्ता, मार्केटयार्ड, कोंढवा, कर्वे रस्ता, शिवाजीनगर, येरंडवणे, बी. टी. कवडे रस्ता, पाषाण, सूस, आंबेगाव, दत्तवाडी शहरातील मध्यवस्तीतील पेठा या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.
पुणे शहर आणि परिसरावर १२ किलोमीटर उंचीचा ढग रात्री असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. ते म्हणाले, ”हा ढग रात्री पुण्यावर जात होता. तो ज्या भागातून पुढे सरकला त्या भागात मुसळधार सरी पडला.”
का पडला मुसळधार पाऊस?
सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला.
काय काय झाले?
– शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाणी शिरले
– टिळक चौकातील दुकानांना पाण्याचे लोंढे धडकले
– कात्रज, येवलेवाडी स्मशानभूमी, उंड्री, पिसोळी, हडपसर, बिबवेवाडी, सुखसागर सिंहगड रस्ता, धायरी, एनआयबीएम रस्ता पावसाने धुमाकूळ घातला
– आंबेगाव, दत्तनगर, जांभूळवाडी, बिबवेवाडी, बी. टी. कवडे रस्ता या भागात रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडित झाला.
– नाना पेठेतील अशोक चौक
– रेल्वे स्थानकासमोरील तुकाराम शिंदे वाहनतळ आणि भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरले.
– हडपसरमध्ये झाड कोसळले
सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण पुलापासून ते कात्रज चौकापर्यंत रस्त्यावरील सर्व वाहतूक पावसामुळे ठप्प झाली होती