कुठे नेऊन ठेवलीय लालपरी माझी – कर्जतच्या प्रवाश्यांसह विद्यार्थ्यांचा टाहो !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | 10 जानेवारी 2022 | एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह एसटी कर्मचाऱ्याच्या विविध रास्त मागण्यासाठी मागील अडीच महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आज संप मिटेल ? उद्या मिटेल ?सर्वसामान्य प्रवाशांची “लालपरी” पुन्हा रस्त्यावर नियमित धावेल अशी भाबडी आशा लागली असतानाच आंदोलन संपले नसल्याने “कुठे नेऊन ठेवलीय लालपरी माझी” हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. सर्वसामान्य प्रवाशांनंतर विद्यार्थी वर्ग देखील मोठ्या कात्रीत सापडला आहे. प्रवाशांशिवाय बसस्थानक ओस पडलेले चित्र मनाला चटका देणारे ठरत आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य परिवहन मंडळाचा राज्य सरकारात विलीनीकरण करावे यासह एसटी कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यासाठी जवळपास अडीच महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्या दिवसापासून कर्जत बसस्थानकात तुरळक तीन ते चार वेळाच एक अथवा दोन बसगाड्या येताना दिसल्या. मात्र त्याही विना प्रवाशी अगोदरच संपामुळे तोट्यात असणारे महामंडळ आणखी संकटात जाण्याची चिन्ह निर्माण होत असल्याने त्याही बंद होण्याची वेळ दिसत आहे.

दिवाळी, भाऊबीजमध्ये सर्वात जास्त त्रास प्रवाशांना झाला, बहीण माहेरी आल्यावर सासरी जाताना भाऊरायाचा खिशाला मोठा ताण पडला होता. कोरोनाची तीव्रता कमी झाली राज्य सरकारने शाळा उघडण्याची तयारी केली. शाळा उघडल्या देखील मात्र विद्यार्थी वर्गाला खरा त्रास होतोय तो एसटी संपाचा. शाळा-महाविद्यालयात येताना त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी पालकासह विद्यार्थ्याना पण मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत.

अगोदरच दोन वर्षे कोरोनाची झळ सर्वानाच सोसावी लागली. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून पालक स्वताच्या पोटाला चिमटा घेत तो भार सोसत आहे. मुलांप्रमाणे मुलीदेखील आता दुचाकी चालवत शाळा- महाविद्यालय गाठत आहे. वाहनांना लागणारे इंधन दोघे तिघे समान हिस्सा सहभाग देत भरताना दिसतात. मुलीना गाडी चालवत शाळेत जाताना ती पुन्हा घरी येईपर्यंत पालक देखील चिंतातूर होतात. सरकारने एसटी कर्मचाऱ्याच्या संपावर समाधानकारक तोडगा काढावा आणि सर्वसामान्य प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पालक करताना दिसतात.

म्हणून घरचे रोज १०० देतात…

दोन वर्षे शाळा- महाविद्यालय बंद होते. शालेय कामकाजासाठी पालकांनी आम्हाला महागडा मोबाईल, त्यास रिचार्ज करीत आमचे शिक्षण सुरू ठेवले. अगोदर शेतमालाला भाव नाही. जिल्हाबंदी असल्याने शेतमाल घरातच पडला. काही वाया गेला. मोठे आर्थिक नुकसान पालकांना सहन करावे लागले. आता शाळा सुरू झाल्या पण एसटी बंद असल्याने आम्हाला येण्या-जाण्यासाठी खाजगी वाहनांना भाडे पदर भरावे लागत आहे. भाडे देखील एसटी पेक्षा अधिक असल्याने रोज १०० रुपये देखील पुरत नसल्याची खंत एका बाहेरगावहुन येणाऱ्या विद्यार्थिनीने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली.

ट्रिपल सीट गाडी धरली पण शाळेची बॅग्ज दिसताच…

शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कायम पोलीस रस्त्यावर उभे असतात. नियम मोडणार्यांवर ते दंडात्मक कारवाई करीत असतात. परवा ट्रिपल सीट असणारे दोन चार वाहने पोलीस कर्मचाऱ्यानी पकडली. मात्र शाळेची बॅग मागे दिसताच त्यांनी तात्काळ पुढे व्हा असे फर्मान सोडले. विद्यार्थी काही काळ गोंधळले पण पोलिसांचा आदेश मानून गावी रवाना झाले. शेवटी आम्ही पण मुलांचे पालक आहोत शिक्षणासाठी मुलांची धडपड पाहता थोडा वेळ कर्तव्य बाजुला ठेवावे लागते अशी प्रतिक्रिया वाहतूक नियंत्रक पोलिसांनी दिली.