जामखेडमध्ये मध्यरात्री रंगला अपहरणाचा थरार, पाच जणांच्या टोळक्याने केले मालट्रकचे अपहरण, ट्रकचालकास बेदम मारहाण !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 10 जानेवारी | Jamkhed Crime News | एका मालट्रकचे अपहरण (kidnapping case) करून ट्रकचालकास बेदम मारहाण करण्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. जामखेड शहरात (jamkhed) मध्यरात्रीपासून रंगलेल्या अपहरणाच्या थराराने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांच्या अज्ञात टोळक्याविरोधात अपहरणाचा गुन्हा (Jamkhed Police Station) दाखल करण्यात आला आहे. (Truck driver beaten after hijacking a truck, Jamkhed police station has registered a case against five unidentified accused)

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिक येथील जितेन्‍द्र कुमार जगदीश राणा (वय 43 वर्ष) हा स्व-मालकीची मालट्रक क्रमांक MH.15.BJ.1666 मधून 8 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता पारनेर तालुक्यातील सुपे येथून टोमॅटोचे रिकामे कॅरेट घेऊन लातूरच्या दिशेने निघाला होता. अहमदनगर- जामखेड रोडवरील जकात नाका येथे रात्री साडेदहा वाजता प्रवेश पावतीचे पैसे देत असताना पाठीमागून आलेली MH.02 CW.7263 ही कार मालट्रकला घासली होती.

त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जितेन्‍द्र कुमार आपली मालट्रक घेऊन जामखेडमध्ये आल्यानंतर जामखेड शहरातून बीड कॉर्नर येथून तो बीड रस्त्याने जात असताना MH.02 CW. 7263 या कारच्या चालकाने मालट्रकला कारगाडी आडवी लावली.

कारमधून आलेल्या अज्ञात पाच जणांनी मालट्रक चालक जितेन्‍द्र कुमार याला मालट्रकमधून खाली उतरवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तु आमच्या कारगाडीला अहमदनगर जवळील जकात नाक्यावर अपघात केल्याने आमच्या कारचे नुकसान केले आहे असे म्हणत नुकसान भरपाई दे अशी मागणी करू लागले.

त्यानंतर दोघांनी जितेन्‍द्र कुमारला त्याच्या मालट्रकमध्ये बळजबरीने बसवले व गाडी चालवण्यास लावली. जामखेडमधील बालाजी फर्निचर समोर गाडी घेऊन जात आमच्या कारच्या नुकसानीचे 50 हजार रूपये दे असे म्हणुन 9 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जितेन्‍द्र कुमार याला गाडीतच डांबून ठेवले. या काळात त्याला पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच गाडीची काच फोडली. त्यानंतर ते तिथून फरार झाले.

घटनेनंतर जखमी मालट्रक चालक मालक जितेन्‍द्र कुमाने जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली. त्यानंतर त्याच्यावर जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

जामखेड पोलिस स्टेशनला जितेन्‍द्र कुमार जगदीश राणा यांच्या फिर्यादीवरून पाच अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 341, 363, 324, 323, 143, 147, 148, 427 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार गाडे हे करत आहेत.

अपहरणाची घटना उघडकीस आल्याने जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी जामखेड पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे.