अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ! Karjat Police Arrest Man For Raping Minor Girl

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।10 जानेवारी 2022 । अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात कर्जत पोलिसांनी एकास बेड्या ठोकण्याची कारवाई केली. (Karjat police arrest man for raping minor girl)

प्रकाश चंद्रकांत वगरे ( prakash chandrkant vagare) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणात जामीनावर होता. पिडीतेने लैंगिक अत्याचाराचा जबाब नोंदवल्याने कर्जत पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत कर्जत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी प्रकाश चंद्रकांत वगरे (रा. गलांडवाडी) याने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फुस लावुन पळवून नेले होते. याबाबत पीडितेच्या भावाने आरोपी विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपीस कुळधरण परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी पिडीतेने आरोपीच्या दबावापोटी अत्याचाराची कबुली दिली नव्हती. सदर मुलीस अहमदनगर बालकल्याण समिती यांच्यासमोर हजर केले असता तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला होता.

कर्जतच्या न्यायालयाने आरोपीची मुक्तता केली होती. मात्र दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी पिडीत मुलीने घुमजाव करत नव्याने कर्जत पोलिसांत जबाब नोंदवला. यात पिडीतीने सांगितले की, आरोपीने  मला दौंड येथे पळवून नेले. तिथे खोली भाड्याने घेतली. माझ्या इच्छेविरुद्ध तीनदा बलात्कार केला.

पिडितेने नव्याने दिलेल्या जबाबामुळे कर्जत पोलिसांत आरोपी प्रकाश चंद्रकांत वगरे याच्याविरोधात दाखल असलेल्या कलम 363 च्या गुन्ह्यात कलम ३७६(२) (आय) (जे)(एन) ३७६(३) बा.लै.अ.सं कायदा (पोस्को) २०१२ कलम ३,४,५ (एल) व ६ अशी वाढीव कलमे लावण्यात आली. तेव्हापासून आरोपी फरार होता. तो सतत जागा बदलून राहत असायचा.

सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतिष गावीत हे करत होते.आरोपीचा न्यायालयात जामीन झाल्याने त्यास पुन्हा अटक करुन त्याची कोठडी घेण्याचे मोठे आव्हान कर्जत पोलीसांसमोर उभे होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिष गावीत, रायटर पो.कॉ.संतोष फुंदे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायालयात रिपोर्ट देवुन आरोपीचा जामीन रद्द करुन घेतला व संबंधित गुन्हा हा ‘पाॅक्सो’ कलमांतर्गत असल्याने तातडीने श्रीगोंद्याच्या विशेष न्यायदंडाधिकारी जिल्हा व सत्र न्यायालयाची आरोपीस तपासकामी पुन्हा ताब्यात घेण्याची परवानगी मिळवली.

आरोपी हा फरार असल्याने आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आव्हान कर्जत पोलिसांसमोर होते. आरोपीच्या शोधासाठी कर्जत पोलिस सतत त्याच्या मागावर होते. अखेर आरोपी हा श्रीगोंदा येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. कर्जत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रकाश वगरे यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिष गावीत, पो.कॉ.संतोष फुंदे, पो.कॉ.बेग यांचा पथकाने ही धडाकेबाज कारवाई पार पाडली.