कर्जत – जामखेडमधील वीज प्रश्नांवर रोहित पवारांचा तोडगा : मतदारसंघात विविध विकास कामे सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसंस्था । कर्जत – जामखेड मतदारसंघातील वीज प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. (Rohit Pawar solves power problems, various works started in Karjat Jamkhed constituency)

नवीन उपकेंद्रांची निर्मिती तसेच लिंक लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अगामी काळात मतदारसंघातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुरू असलेल्या या कामांमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

आमदार रोहित पवारांच्या आमदार निधीतून जामखेड तालुक्यातील जवळा, हळगाव, नान्नज  पाटोदा, आरणगाव व पिंपरखेड या सहा ठिकाणी लिंकलाईनचे कामही सुरू आहे.

जामखेड तालुक्यातील नायगाव येथे 33/11 केव्ही सबस्टेशनला मंजुरी मिळाली आहे. या उपकेंद्राचा नायगाव, नाहुली, देवदैठण, बांधखडक, आनंदवाडी या गावांतील शेतकऱ्यांना तसेच गावांतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांना फायदा होणार आहे.

राजुरी उपकेंद्रातून सुरु असलेल्या नायगाव 11 केव्ही शेती पंप वाहिनीची लांबी ही 18 किलोमीटर असून नवीन उपकेंद्रामुळे ती 8 किलोमीटर कमी होणार आहे. तसेच राजुरी गावठाण वाहिनीची लांबी ही 12 किलोमीटर असून नव्या उपकेंद्रामुळे ती 7 किलोमीटर कमी होणार आहे.

कर्जत जामखेडमधील सोलार प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे आणि लवकरच ते कामही पूर्णत्वास जाईल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

कर्जत तालुक्यातील 33/11 पाटेवाडी सबस्टेशन येथे ओव्हरलोडींगमुळे आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. याठिकाणी 3 किलोमीटर लिंक लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याचा फायदा  आनंदवाडी, हांडाळे, निमगाव व पाटेवाडी येथील शेतकऱ्यांना होणार आहे.

शिंपोरा येथे 4 किलोमीटर तर भांबोरा येथे 3 किलोमीटर लिंक लाईनचे काम प्रगतिपथावर आहे.त्याचबरोबर राशीनमध्ये असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढवली जाणार आहे.दिघोळ व घुमरी येथील नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळाली आहे अशी माहिती समोर येत आहे.