सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी मस्जिदींचा वापर व्हावा

पुणे । कलीम अजीम । “१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम मिला-जुला म्हणजे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलेला लढा होता. ह्या एकतेला पाहून इंग्रज घाबरले आणि त्यांनी सत्तेसाठी दोन समुदायामध्ये फूट पाडायचे प्रयत्न सुरू केले. हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाडले. आपल्याकडील काही स्वार्थी नेते त्याला बळी पडले. आजही हेच सुरू आहे, त्यामुळे दोन सुमदायामध्ये वेगळेपणाची दरी वाढत चाललेली आहे, ही दरी कमी करण्यासाठी समाज संवाद महत्त्वाचा आहे,” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.

पुण्यात कौसर बाग मस्जिद येथे समाज संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी देशमुख बोलते होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या मस्जिद परिचय मेळाव्याला परिसरातील अनेक गैरमुस्लिम स्त्री-पुरुष नागरिक व मान्यवर उपस्थित होते. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्याचे पाण्याची बाटली व खजूर देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना नमाजपूर्वी केले जाणारे वजू (स्वच्छता) काय असते, ते कसे करावे व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.

एसआयओ या विद्यार्थी संघटनेच्या स्वयंसेवकांनी मान्यवरांना बाहरेचा सर्व परिसर फिरवून दाखविला. शिवाय इतर माहितीदेखील दिली. त्यानंतर मस्जिदीच्या गाभाऱ्यात जिथे इमाम नमाजचे नेतृत्व करतो, तिथे सर्वांना घेऊन जाण्यात आले. अली इनामदार यानी मस्जिदीच्या आतल्या रचनेचा परिचय करून दिला. प्रा. रशीद शेख यांनी मस्जिदची रचना, निर्मिती, जानिमाज, पुस्तके, नमाजच्या वेळा, दररोज नमाजमध्ये इमाम कुठली वचने पठण करतो, त्या श्लोकाचे अर्थ इत्यादी समजावून सांगितली.

त्यानंतर अज़ान देऊन त्याचे शब्दश: भाषांतर करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती नवेद यांच्या मधाळ किराअतने नमाज संपन्न झाली. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी गाभाऱ्यात बसून प्रत्यक्ष नमाज पाहिली.  

त्यानंतर डॉ. रफीक सय्यद यांनी नमाजमध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआनच्या वचनांचा सार व त्याचा अर्थ समाजावून सांगितला. तत्पूर्वी निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते गाजिउद्दीन रिसर्च सेंटर व डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन प्रकाशित ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.

पुस्तकावर बोलताना सरफराज अहमद म्हणाले, हजरत बिलाल हे एक हब्शी गुलाम होते, त्यांना मुक्त करून प्रेषितांनी समानता आणि आदर, सन्मानाचा एक महत्त्वाचा संदेश दिला. इस्लामचे ते प्रथम मुअज्जीन होते. त्यांना काबागृहावर चढून अजान देण्यासाठी प्रेषितांनी निमंत्रण दिले, ती वर्णव्यवस्थेविरोधात इस्लामची पहिली चळवळ होती, असे म्हटले.

मस्जिद परिचयाचा मुख्य कार्यक्रम दीड तास चालला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना अल्पाहार देण्यात आला. त्यानंतर परिसरातच समाज संवाद कार्यक्रम झाला. सरफराज अहमद यांनी मस्जिदीचा सामाजिक व सांस्कृति तथा राजकीय इतिहासाची पुनर्मांडणी केली. मस्जिदे ऐकेकाळी राजकीय व सामाजिक कल्याणाची केंद्र होती, ती स्वतंत्र व मुक्त विद्यापीठे होती. इजिप्तचे अल अजहर, देवबंदचे विद्यापीठ हे सुरुवातीला मस्जिदी होत्या. त्यानंतर त्यांचे विद्यापीठात रुपांतर झाले, आज आपल्या मस्जिदी आधुनिक शिक्षणाची केंद्रे व्हावीत, असे ते म्हणाले.

इस्लामचा सामाजिक व आर्थिक विचार त्यांनी उपस्थितासमोर मांडला. मस्जिदी गरिब, निराश्रीतासाठी निवारा आहेत, तसेच ते गरजूवंतासाठी अन्नछत्र आहेत. मस्जिदींचा वापर फक्त नमाजसाठी न होता, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आणि परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या विधायक कार्यासाठीदेखील झाला पाहिजे, असेही सरफराज म्हणाले.  

ह्या मेळाव्यात साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी इस्लामी संस्कृतीवर विचार मांडले. वेगेवेगळ्या काळातील समाजाला समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम होणे गरजेचे आहे,असे सांगत शिरसाठ म्हणाले, “संस्कृती असो किंवा चालिरिती, परंपरामध्ये काळाचा विचार करून काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. परंतु काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसे त्यातले काही कालबाह्य झालेले असते किंवा काही योग्य ठरणार नसते त्यामुळे संस्कृती, समाज पुढे जायचा असेल तर समाजासाठी जे चांगले आहे, परंपरेतून आलेले, धर्मातून आलेले, श्रद्धेतून, विश्वासातून आलेले ते आपण टिकवावे, अधिक समृद्ध करावे. आणि जे-जे कालबाह्य आहे किंवा सदोष आहे, ते मागे टाकून पुढे जायला पाहिजे, असे केले नाही तर समाजाला एक प्रकारचे साचलेपण येते.”

दिल्लीहून आलेल्या ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे चेअरमन एड. शरफुद्दीन अहमद यांनी समूह संवादावर भर दिला. तसेच हिंदू-मुस्लिमांनी प्रचारी संदेशांना बळी न पडता, आपल्या आसपासच्या सर्व धर्मीय नागरिकांशी संवाद प्रस्थापित करावा, असे म्हटले.

सलोखा मंचचे प्रमोद मुजुमदार उपस्थिताशी संवाद साधत म्हणाले, “देशातील, शहरातील अल्पसंख्यांना विश्वासात घेणे ही बहुसंख्याकाची जबाबदारी आहे. सामाजिक सद्भाव टिकवून अल्पसंख्याकाशी, मुस्लिमांशी संवाद साधणे ही आज गरजेचे आहे. धर्मकेंद्री राजकारण होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे मुस्लिम हवालदिल झालेला आहे, अशा मुस्लिमांच्या पाठिशी ‘सलोखा’ आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विश्वास देतो की, आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.”

सलोखा मंचच्या डॉ. संजिवनी कुलकर्णी यांनी मुस्लिमांविषयी होत असलेल्या अप्रचाराला बळी पडू नये, असे सांगितले. युक्रांदच्या नीलम पंडित आपल्या ऐंशी वर्षीय आईला घेऊन आलेल्या होत्या. मस्जिद पाहून आई खूप कृतार्थ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या परिचय मेळाव्यात लोकायत, नोइंग गांधी, संविधान संवादक फोरमचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष मस्जिद पाहून आत्मिक समाधान वाटले, अशा भावना व्यक्त केल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तबलीग जमात (पुणे)चे विशेष प्रयत्न होते. असे उपक्रम विविध शहरात व दिल्ली मरकजपर्यंत पोहोचविण्याची हमी तबलीगच्या संघटकांनी दिली. कौसर बाग मस्जिद कमिटीने परिसरातील गैरमुस्लिम सोसायटीमध्ये जाऊन मस्जिद परिचयासाठी अनेकांना निमंत्रणे पाठविली होती. तसेच पोलीस, आईबी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते.

सावित्री-फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी समाज संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन व अन्य व्यवस्थेचे संयोजन केले होते. तसेच उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

कलीम अजीम यांनी सर्व निमंत्रित पाहुण्याचे आभार मानले. मस्जिदमध्ये दाखविण्याकरिता विशेष असे काही नसते. तसेच लपविण्याकरितादेखील असे काही नसते. त्यामुळे अगदी कोणीही, कधीही येऊन मस्जिद पाहू शकतो. मस्जिदीबद्दल होत असलेल्या अप्रचाराला बळी पडण्याआधी परिसरातील एखाद्या मस्जिदला भेट द्या, असेही त्यांनी सांगितले. राहिलेल्या त्रुटी व उणीवा पुढच्या परिचय मेळाव्यात भरून काढण्याचे आश्वासन कलीम यांनी दिले. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटी, तबलीग जमात यांचे विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचा हातभार लागला, अशा सर्वांचे त्यांनी अभार मानले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलचे संदेश भंडारे, सलोखा मंचचे सर्व पदाधिकारी, युक्रांदचे संदीप बर्वे, ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे एड. संतोष जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सर्वजण आपल्या मित्र-सहकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाला आले होते.

पारनेहूर रफिक सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटीचे सेक्रेटरी जफर खान उपस्थित होते. कार्यक्रमाला हजर असेलल्या प्रत्येकांना साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ आणि ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच संदेश लायब्ररीच्या कार्यकर्त्यांनी कुरआनची मराठी प्रतही सर्वांना भेट दिली.

ह्या समाज संवाद कार्यक्रमाला व्यक्तिगत निमंत्रणे पाठवून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेच काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिलेले होते. विशेष म्हणजे मस्जिद कमिटीच्या नोटीस बोर्डवर मराठी भाषेत सूचना लिहिण्यात आलेली होती. त्यानुसार मस्जिद पाहण्यासाठी हिंदू-मुस्लिम समुदायातील स्त्रिया मोठ्या संख्येने हजर झालेल्या होत्या. कार्यक्रमाला आलेला चांगला प्रतिसाद पाहून नियमित मस्जिद परिचय व समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सावित्री-फातिमा विचार मंचच्या वतीने कळविण्यात आले.