Beed Murder case | जामखेड गुन्हा शोध पथकाची हॅट्ट्रिक ; बीड खुन प्रकरणातील दोघांना ठोकल्या बेड्या, अवघ्या तीन दिवसांत खून प्रकरणाचा उलगडा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Beed Murder Case | जामखेड पोलिस दलाचे गुन्हा शोध पथक गेल्या तीन दिवसांपासून कमालीचे ॲक्शन मोडवर आले आहे. सलग तिसऱ्या दिवशी आणखी एका खून प्रकरणातील दोघा आरोपींना जामखेडमध्ये बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई करत हॅट्ट्रिक साधली. तिसरी कारवाई तर तीन दिवसांपुर्वी घडलेल्या खुन प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्याची आहे. या कारवाईमुळे जामखेडला आसरा घेणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका खून प्रकरणातील आरोपी अटक करून चोवीस उलट नाही तोच ओरिसा राज्यातील सुलेपट पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून करून सन 2018 पासून परागंदा असलेल्या जामखेडमधील एका आरोपीला बेड्या ठोकण्याची कामगिरी जामखेड पोलिसांनी कालच पार पाडली होती.

त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी गुन्हा शोध पथकाने आणखी एका खून प्रकरणाचा उलगडा करत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल खुन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही खूनाची घटना तीनच दिवसांपुर्वी बीडमध्ये घडली होती.

हॉटेलमधील बील देण्याच्या कारणावरून बीड येथे एकाचा खुन करणा-या गुन्ह्यातील 2 संशयित आरोपी जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे आले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने 24 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धडक कारवाई दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांकडे पोलिस पथकाने सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे 1)आदेश भगवान जोगदंड वय २० वर्षे रा.जायकवाडी काँलनी, नगर रोड, बीड ,२) प्रथमेश तुकाराम घुले वय २२ वर्षे,रा. अंकुश नगर, नगर रोड, बीड ,असे असल्याचे सांगितले.

त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे कसून सखोल विचारपूस केली असता त्यांनी किशोर नंदलाल गुरखूदे रा.जव्हेरी गल्ली ,बीड यास लोखंडी रॉडने मारहान केल्याचे सांगितले त्यानंतर तो उपचार घेत असताना मयत झाला होता.आम्हीच सदर गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी.

आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात

सदर गुन्हयाबाबत खात्री केली असता शिवाजी नगर,बीड पोलीस ठाणे येथे गु र नं- 36/2022 भादवी कलम 302,307,504, 506, 34 प्रमाणे 21 जानेवारी रोजी गुन्हा दाखल होता. अवघ्या तीन दिवसापुर्वी बीड शहरात घडलेल्या खुन प्रकरणाचा जामखेड पोलिसांनी उलगडा केला. दोघा आरोपींना बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाथरकर यांच्या ताब्यात देण्यात आले.

नेमकी खूनाची घटना का घडली ?

एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं देखील किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. भाच्याच्या हॉटेलात जेवण केल्यानंतर काही तरुणांनी बिल देण्यावरून त्याच्याशी वाद घातला.यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या मामाला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित तरुणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करत हॉटेल चालकाच्या मामाचा जीव घेतला आहे.किशोर नंदलाल गुरखुदे असं हत्या झालेल्या 43 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते बीड शहरातील जव्हेरी गल्ली येथील रहिवासी होते.

मध्यस्थी करायला गेले अन जीव गमावला

मृत गुरखुदे हे पानटपरीचालक असून बसस्थानक परिसरात त्यांची छोटंस दुकान आहे. तर याच परिसरात त्यांच्या भाच्याचं हॉटेल आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी रविवारी मारेकरी तरुण मृत व्यक्तीच्या भाच्याच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या बिलावरून भाच्याशी वाद घालायला सुरुवात केली.भाच्यासोबत तरुण भांडत असल्याचं पाहून मृत किशोर गुरखुदे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले.

उपचार सुरू असतानाच निधन

यावेळी संतापलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याच्या सहाय्याने किशोर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.हा हल्ला इतका भयानक होता की, मामा जागीच गंभीर जखमी झाले. यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

चौघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल

या प्रकरणी चौघांविरुद्ध खुन आणि खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणातील दोघा आरोपींना जामखेड पोलिसांनी जामखेडमधून 24 रोजी अटक करत खून प्रकरणाचा तातडीने उलगडा केला. जामखेड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोना.अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव ,पोकॉ. संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ. अरूण पवार ,पोकॉ. संदिप आजबे ,पोकॉ.सचिन देवढे यांनी केली आहे .