जामखेड पोलीस प्रशासनाकडूून एक गाव-एक गणपतीसाठी गावोगावी बैठका सुरू, ग्रामस्थांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत गणेशोत्सव साजरा होणार आहे. कोरोना महामारीनंतर यंदा होणारा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी गावोगावी सुरू आहे. गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतले आहेत. अश्यातच जामखेड तालुक्यात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने कंबर कसली आहे.

Jamkhed police administration started village-to-village meetings for one village-one Ganesha, villagers are getting positive response

जामखेड तालुक्यात यंदा होणारा गणेशोत्सव आगळा वेगळा व्हावा, या उत्सवातून गावोगावी एकात्मता रहावी, कुठलेही वाद विवाद न करता संपुर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श प्रस्तापित करावा यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून जामखेड तालुक्यात यंदा एक गाव एक गणपती ही मोहिम गतिमान केली जाणार आहे. त्यादृष्टीने जामखेड पोलिस दलाची टीम गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहे.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक बाळासाहेब तागड ,पोलीस नाईक राहुल हिंगसे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे ,पोलीस कॉन्स्टेबल भगीरथ देशमाने यांच्या टीमने एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याबाबत पाटोदा, फक्राबाद, वंजारवाडी, धानोरा, झिक्री, खांडवी, आरणगाव, पाटोदा या आठ गावांमध्ये बैठका घेतल्या आहेत. गुप्तवार्ता विभागाचे पोलिस नाईक अविनाश ढेरे हे या सर्व उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी मोठी मेहनत घेत आहेत.

एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याबाबत  पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती आणि त्यांचे सहकारी गावकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. गावकऱ्यांचाही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एक गाव एक गणपतीसाठी पुरेपुर प्रयत्न करू असा विश्वास गांवकरी देताना दिसत आहेत. यंदाचा गणेशोत्सव शांततामय वातावरणात तोही धुमधडाक्यात साजरा व्हावा यासाठी जामखेड पोलिस दलाने कंबर कसली आहे. गावोगावचे गावपुढारी पोलिस दलाला सहकार्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

यंंदा जामखेड तालुक्यात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी पोलिस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी जाऊन बैठका घेत आहेत. या बैठकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवून नवा आदर्श निर्माण करावा. गणेश मंडळाचे पदाधिकारी, सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, नागरिक पोलिस प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमाला सहकार्य करतील हा विश्वास आहे.
 – संभाजीराव गायकवाड, पोलिस निरीक्षक, जामखेड