नवी मुंबईच्या कळंबोली गोविंदा पथकाने जिंकली जामखेड दही हंडी स्पर्धा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सोमवारी केले होते. जामखेडच्या नागेश विद्यालय येथील मैदानात हा उत्सव पार पडला. विशेष म्हणजे प्रसिद्ध सिने अभिनेत्री व जय मल्हार फेम बाणु म्हणजेच इशा केसकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या उत्सवाला स्थानिक नागरिकांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kalamboli Govinda team from Navi Mumbai won the Jamkhed Dahi Handi competition

अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरलेली ही दही हंडी स्पर्धा साडे चार ते पाच तास चालली अनेक गोविंदा पथकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता, अखेर नवी मुंबई येथील शिव प्रेरणा सुपर दर्या गोविंद पथक यांनी सात थर रचून रात्री अकरा वाजता ही दही हंडी फोडली आणि विजयाचा मान आपल्या नावावर करून घेतला.

नागरिकांचा उत्साह आणि आनंद बघता आमदार रोहित पवार यांनीही या कार्यक्रमात ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली व या दही हंडी उत्सवाचा जनतेत जाऊन पुरेपूर आनंद लुटला. तसेच यावेळी बोलत असताना पुणे-मुंबई सारख्या शहरातील दही हंडीचे वातावरण आपल्या मतदारसंघात निर्माण व्हावे व नागरिकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन मतदारसंघात केल्याचे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

प्रथम क्रमांक मिळवलेल्या नवी मुंबईतील गोविंदा पथकाला 1 लाख 1 हजार 111 रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर 3 संघांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले गेले. अशा प्रकारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याचे काम आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून होत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे.