काय गर्दी.. काय हंडी.. काय उत्साह.. एकदम ओक्केमधी, ईशा केसकरच्या जलव्याने जामखेडकर घायाळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। वार सोमवार.. वेळ सायंकाळची..  सुर्य मावळतीला आलेला.. तरूण – तरूणी.. महिला.. बच्चेकंपनी.. पुरुष मंडळी.. राजकीय कार्यकर्ते.. नागेश विद्यालयाच्या दिशेने.. अंधार पडताच.. नागेश विद्यालयाचे मैदान आकर्षक रोषणाईने उजळून निघालेलं.. हजारो नागरिकांच्या गर्दीनं परिसर फुलून गेलेला.. सर्वांच्या नजरा व्यासपीठावर.. ती कधी येते आणि तिला डोळेभरून पाहतो कधी याचीच उत्सुकता शिगेला.. जमलेल्या गर्दीतून वाट काढत ती व्यासपीठावर दाखल झाली आणि मैदानात एकच जल्लोष झाला.. बानू आली… बानू आली.. अन् मैदानात जोश भरला गेला… निमित्त होते जामखेड दहीहंडी स्पर्धेचे !

What a crowd.. What a handi.. What a cheer.. How is everything okke madhi, Isha Keskar won the hearts of Jamkhedkars

कर्जत – जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या पुढाकारातून सोमवारी सायंकाळी जामखेडच्या इतिहासातील सर्वात मोठी ऐतिहासिक दही हंडी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी लोकप्रिय अभिनेत्री इशा केसकर अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या बानूने हजेरी लावली. बानूच्या जलव्याने जामखेडकर मात्र घायाळ झाले होते.नागरिकांचा उत्साह आणि आनंद बघता आमदार रोहित पवार यांनीही या कार्यक्रमात ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली व या दही हंडी उत्सवाचा जनतेत जाऊन पुरेपूर आनंद लुटला.

जामखेड दहीहंडी स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरली. ही स्पर्धा साडे चार ते पाच तास चालली.संगीताच्या तालावर बेधुंद थिरकणारी तरूणाई गोविंदा पथकाचा उत्साह वाढवताना दिसत होती. राज्यभरातील गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. नवी मुंबई येथील शिव प्रेरणा सुपर दर्या गोविंद पथक यांनी सात थर रचून रात्री अकरा वाजता दही हंडी फोडली आणि विजयी गुलाल उधळला.

प्रथम क्रमांक मिळवलेल्या नवी मुंबईतील गोविंदा पथकाला 1 लाख 1 हजार 111 रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर 3 संघांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले गेले. कार्यक्रमासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात कुठलाही गोंधळ गडबड होऊ नये यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील जामखेड पोलिस दलाच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

काय गर्दी.. काय हंडी.. काय उत्साह.. एकदम ओक्केमधी – ईशा केसकर

लहानपणापासून बार्शीला जायची हीच वाट असायची, मला कौतूक याचं वाटतयं की, आज इतक्या वर्षांनी जामखेडला आल्यानंतर जामखेडचं बदलेलं चित्र पाहून समाधान वाटलं, खरे आभार मानले पाहिजेत आमदार रोहित दादा यांचे, तुमचं दादांवर जे प्रेम आहे ते तुम्ही मोठ्या संख्येंने उपस्थित राहून दाखवलं आहे. रोहित दादा संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच तुम्ही आज मोठ्या संख्येंने कार्यक्रमाला हजेरी लावली. मी दहीहंडीचे अनेक कार्यक्रम केले पण महिलांची उपस्थिती कधी पाहिली नाही, पण जामखेडमध्ये महिलांची उपस्थिती पाहून आनंद झाला. कार्यक्रमाचा जोश पाहून असं वाटतयं काय गर्दी.. काय हंडी.. काय उत्साह.. एकदम ओक्केमधी. असे प्रसिध्द सिने अभिनेत्री ईशा केसकर म्हणाल्या.

महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा ध्वज कर्जतमध्ये उभारणार – रोहित पवार

कर्जत जामखेडच्या भूमीत मोठी ताकत आहे.ही ओळख महाराष्ट्रात पोहचली आहे. आता पुढच्या काळात देशात आपली नवी ओळख प्रस्थापित करायची आहे. जामखेड दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी सर्व समाजाचे लोकं एकत्रित आले. ही आपली खरी ताकद आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा ध्वज कर्जतमध्ये उभारला जाणार आहे. मतदारसंघातील जनता एक कुटुंब आहे. मतदारसंघात होणारे कार्यक्रम हे कुटुंबासाठी आहेत. हेच वातावरण तुमच्या साथीने जपायचं आहे. कर्जत-जामखेडची नवी ओळख घडवायची आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले.