मराठवाड्याच्या सरहद्दीवर राम शिंदेंची जलक्रांती, शेतकरी वर्गात आनंद, राम शिंदेंच्या हस्ते जलपुजन, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मानले आभार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर मराठवाड्याच्या सरहद्दीला असलेल्या भागात गेल्या पन्नास वर्षांपासून विकासाची गंगा पोहचली नव्हती, परंतू तत्कालीन जलसंधारण मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा राम शिंदे यांच्या दूरदृष्टीतून दुर्गम भागातील गावांमध्ये विकास पोहचवण्याचा विडा उचलला गेला आणि या भागात जलक्रांतीची मोठी किमया झाली आहे. यातून बळीराजा आणि गावकरी आनंदून गेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचं शेवटचं टोक म्हणून जामखेड तालुक्यातील खर्डा हा परिसर ओळखला जातो. हा परिसर मराठवाड्याच्या सरहद्दीवरील बालाघाटाच्या डोंगररांगेत वसलेला आहे. नागोबाचीवाडी – मुंगेवाडी – बारगजे वस्ती – पांढरेवाडी – गीतेवाडी – तेलंगशी या भागात दरवर्षी मोठा पाऊस पडतो परंतू या भागात पाणी अडवण्याची व्यवस्था नसल्याने या भागात दरवर्षी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा.
या भागात ऊसतोड मजुरांचे मोठे प्रमाण आहे. या भागातून दरवर्षी होणारे स्थलांतरण रोखण्याबरोबरच या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी या भागात पाण्याची शाश्वत योजना असणे आवश्यक होते. या भागातील जनतेची मागणी लक्षात घेता तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेल्या आमदार राम शिंदे यांनी अमृतलिंग प्रकल्पासाठी तसेच पाझर तलावांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. राम शिंदे आणि पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत त्यावेळी पाझर तलावांचे भूमिपूजन पार पडले होते.
त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतून नागोबाचीवाडी – मुंगेवाडी – बारगजे वस्ती भागातील नागरिकांसाठी एक कोटी दहा लाख रूपये खर्चाचा पाझर तलाव मंजुर केला. तसेच पांढरेवाडी – गीतेवाडी – तेलंगशी भागासाठी वरदान ठरणाऱ्या तलावाचा प्रश्न मार्गी लावला. पांढरेवाडी – गीतेवाडी – तेलंगशी भागातील जनतेची गेल्या 50 वर्षांपासून असलेली मागणी राम शिंदे यांनी मार्गी लावली. या भागातील तलाव यंदा ओव्हर फ्लो झाले आहेत. या तलावांचे आमदार राम शिंदे यांच्या हस्ते रविवारी जलपुजन संपन्न झाले.
यावेळी जलसंधारण विभागाचे अधिकारी प्रल्हाद शिंदे, रविंद्र सुरवसे, डाॅ भगवान मुरुमकर, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, शरद कार्ले, बापुराव ढवळे, उमेश रोडे, गौतम कोल्हे, भास्कर गोपाळघरे, टिल्लू पंजाबी, मदन गोलेकर, वैजनाथ पाटील, महेश दिंडोरे, एकनाथ गोपाळघरे, अर्जुन होडशीळ, संदिप जायभाय, भगवान दराडे, उध्दव हुलगुंडेंसह नागोबाचीवाडी, दरडवाडी, तेलंगशी, पांढरेवाडी, मुंगेवाडी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
पांढरेवाडी – गीतेवाडी – तेलंगशी या भागातील तलाव व्हावा यासाठी स्वर्गीय सुभाष आप्पा जायभाय यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्व. जायभाय यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन जलसंधारण मंत्री तथा विद्यमान आमदार राम शिंदे यांनी या तलावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश केला होता. या तलावाचे काम पुर्ण झाल्यापासून सलग तीन वर्षांपासून हा तलाव पुर्ण क्षमतेने भरत आहे. रविवारी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत या तलावाचे आमदार राम शिंदे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. सदरचा तलाव व्हावा अशी या भागातील नागरिकांची 50 वर्षांपासून मागणी होती. राम शिंदे यांनी दिलेल्या भरीव निधीमुळे या भागातील जनतेची स्वप्नपूर्ती झाली आणि या भागात जलक्रांती अवतरली.
तसेच नागोबाचीवाडी – मुंगेवाडी – बारगजेवस्ती भागातील जनतेला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागायचा. या भागात पाझर तलाव व्हावा ही मागणी सातत्याने व्हायची. या मागणीची दखल घेऊन राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेतून तलाव मंजुर केला. मुंगेवाडी – नागोबाचीवाडी – बारगजेवस्ती पाझर तलावाची एकुण साठवण क्षमता 112 TCM इतकी असून यातून 36 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. यासाठी 1 कोटी 10 लाख इतका निधी खर्च झाला राम शिंदे हे जलसंधारण मंत्री असताना या तलावास मंजुरी देण्यात आली होती. त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर यंदा हा तलाव पहिल्यांदा ओव्हर फ्लो झाला. या तलावाचे जलपुजन रविवारी पार पडले.
आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना त्यांनी आपल्या मंत्री पदाच्या माध्यमांतून जामखेड तालुक्यातील दुर्गम भागात विकासाची गंगा पोहचवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. पाच वर्षानंतर त्यांनी दिलेल्या निधीचे फळ आता जनतेला चाखायला मिळत आहे. जलयुक्त शिवार योजनेतून केलेल्या कामामुळे नागोबाचीवाडी – मुंगेवाडी – बारगजे वस्ती तसेच पांढरेवाडी – गीतेवाडी – तेलंगशी या भागात जलक्रांतीची मोठी किमया झाली आहे. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली लागला आहे. जनतेतून राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
शेतकऱ्यांसाठी घेतलेला सकारात्मक निर्णय आज अस्तित्वात आलाय याचा मोठा आनंद – राम शिंदे
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, मुंगेवाडी – नागोबाचीवाडी – बारगजेवस्ती पाझर तलावामुळे या भागातील 100 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. याचा मोठा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. जिथं आम्हाला दोन पोते ज्वारी होत नव्हती तिथे 20 पोते ज्वारी होईल अशी माहिती शेतकऱ्यांनी मला दिली. या भागात झालेल्या तलावामुळे या भागातील बळीराजाचं उत्पन्न वाढणार आहे. त्याचं जीवनमान उंचावणार आहे. यांच्या परिवारातील अनेक सदस्यांना चांगले शिक्षण घेता येणार आहे. त्यांचं राहणीमान उंचावणार आहे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीची देणगी आहे.
आपला लोकप्रतिनिधी सर्वोच्च ठिकाणी गेल्याच्यानंतर अतिशय दुर्गम भागातल्या लोकांच्यावरती देखील लक्ष ठेवलं पाहिजे ही भूमिका घेऊन तत्कालीन कालखंडात मंत्री असताना काम केलं. आज मला त्याचं मोठ्या प्रमाणात समाधान आहे. आज मी मराठवाड्याच्या सरहद्दीवर आलो, तलावाचं जलपूजन केलं. आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेला सकारात्मक निर्णय आज अस्तित्वात आलाय. या भागात पुर्वी टँकर लागायचा. आता ही समस्या कायमस्वरूपी दुर झाली याचा मला आनंद आहे अशी भावना आमदार राम शिंदे यांनी जलपुजनानंतर जामखेड टाइम्सशी बोलताना व्यक्त केली.