जामखेड- कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील एका 35 वर्षीय युवकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली आहे. केशव पोपट राळेभात असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

Jamkhed young farmer commits suicide due to indebtedness

जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील तरूण शेतकरी केशव राळेभात यांच्या वडीलांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यांच्या उपचारासाठी केशव यांने सोसायटी, बँक व काही उसनवारी स्वरूपात पैसे घेतले होते. परंतू वडीलांना वाचवण्यात अपयश आले होते.

कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतीच्या उत्पन्नावर सर्व काही अवलंबून होते, परंतू  या वर्षी उडीद व इतर पीक वाया गेले. कर्ज फेडायचे कसे या विंवचनेत असलेल्या केशव राळेभात या तरूण शेतकऱ्याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण कुटूंबच उघड्यावर आले आहे.

दरम्यान घटनेनंतर जामखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. जामखेड ग्रामीण रूग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

रविवारी रात्री 9 वाजता शोकाकुल वातावरणात मयत केशव राळेभात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे.