संतोष शिंदे मृत्यू प्रकरणातील आरोपी शुभदा पाटील व राहूल राऊत यांच्या पोलिस कोठडीत वाढ

कोल्हापूर, 30 जून 2023 : कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील तरूण उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil Gadhinglaj) व एपीआय राहूल राऊत (API Rahul Raut) या दोघांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाने वाढ करण्यात आली आहे. 30 जून रोजी त्यांच्या एका दिवसाच्या पोलिस कोठडीत न्यायालयात वाढ केली. आज 1 जूलै रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोर्ट त्यांच्या कोठडीत वाढ करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Increase in police custody of accused Shubda Patil and Rahul Raut in Santosh Shinde death case Gadhinglaj, Shubhada Patil Gadhinglaj

23 जून 2023 रोजी गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्या करतेवेळी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चौघांची नावे लिहिली होती. यामध्ये माजी नगरसेविका शुभदा पाटील व एपीआय राहूल पाटील व पुण्यातील दोघे असे चौघांचा समावेश होता. माजी नगरसेविका शुभदा पाटील व राहुल राऊत या दोघांनी एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी मयत संतोष शिंदे यांना त्रास दिला होता. तसेच संतोष शिंदे यांचा मुलगा अर्जुन सोबत सुध्दा गैरवर्तणूक केली होती. 

माजी नगरसेविका शुभदा पाटील रा गिजवणे रोड गडहिंग्लज (Shubhada Patil) व अमरावती पोलिस कंट्रोलमध्ये कार्यरत  एपीआय राहूल राऊत (रा निलजी ता. गडहिंग्लज (Rahul Raut police Gadhinglaj) हे दोघे संतोष शिंदे यांच्याकडे 1 कोटी रूपयांची खंडणी मागत होते. हे दोघे जण खंडणीसाठी संतोष शिंदे यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वता:सह पत्नी व मुलाला संपवलं, घटना घडल्यापासून शुभदा पाटील व राहूल राऊत हे दोघे फरार झाले होते. त्यांना संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी सोलापुर येथुन अटक करण्यात आली होती.

शुभदा पाटील व राहूल राऊत या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 30 जून रोजी कोठडी संपल्यानंतर या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांच्या समोर उभे करण्यात आले.यावेळी न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांना 1 जूलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. शुक्रवारी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. पुण्यामधील विशाल बाणेकर आणि संतोष पाटे यांचीही नावेही सुसाईड नोटमध्ये होती, हे दोघेही फरार आहेत. कोल्हापूर पोलिस दोघांच्या शोधात आहेत.

दुसरीकडे, उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय राहुल राऊतला निलंबित करण्यात आले आहे. त्याला निलंबित केल्याची माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही निलंबनाची कारवाई असणार आहे.

दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजी राणे यांना नियुक्त करावे, अशी मागणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत राणे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली. राणे यांना फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घालण्याची लेखी विनंती करण्यात आली. राणे यांनी विनंती मान्य केली आहे. विशेष वकील म्हणून नियुक्तीबाबत सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठी संमतीपत्रही ॲड राणे यांनी दिले आहे.

संतोष शिंदे या तरूण उद्योजकाने अगदी कमी वयात आपल्या व्यवसायात मोठी भरारी घेतली होती. अर्जुन उद्योग समुहाच्या माध्यमांतून ते खाद्यतेल व्यवसायात कार्यरत होते. याशिवाय ‘विराज फुड्स’ या नावाने त्यांनी बेकरी उत्पादने सुरू केली. अल्पावधीत त्यांनी आपल्या व्यवसायात मोठा जम बसवला होता. मुंबई, कोकण, कर्नाटक, कोल्हापूर, सीमावर्ती भागात अर्जुन उद्योग समुहाने आपला जम बसवला होता.

नेमकं प्रकरण काय?

उद्योजक संतोष शिंदे यांच्याविरुद्ध काही दिवसांपुर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरूंगवास झाला होता. तेव्हापासून संतोष शिंदे व त्यांचे कुटुंबीय ताणतणाव होते. याशिवाय माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व पोलिस अधिकारा राहूल राऊत (Rahul Raut) हे दोघे संतोष शिंदे यांना एक कोटीची खंडणी मागत होते. आधीच ताणतणाव असलेल्या शिंदेंच्या मागे खंडणीचा ससेमिरा लागला होता. यामुळे ते अधिकच तणावात होते. पाटील व राऊत यांच्याकडून होणारा मानसिक छळास कंटाळून संतोष शिंदे यांनी कुटूंबचं संपवून टाकलं, एका तरूण उद्योजकाचा झालेला करूण अंत कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लावून गेला.