कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याच्या दर्जाबाबत तडजोड करू नका; अन्यथा गाठ माझ्याशी – आमदार राम शिंदे यांचा इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। हायब्रीड अँन्युटी या शीर्षकाखाली कोंभळी फाटा ते कर्जत या 61 कोटी रूपये खर्चाच्या जिल्ह्यातील पहिल्या रस्ता कामाची आमदार प्रा राम शिंदे यांनी आज पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सदर काम दर्जेदार करा. रस्त्याच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड करू नका, अन्यथा गाठ माझ्याशी, असा इशारा आमदार राम शिंदे यांनी ठेकेदार एजन्सी आणि अधिकाऱ्यांना दिला.

Do not compromise on road quality from Kombli Phata to Karjat,  Otherwise be prepared for the consequences - MLA Ram Shinde's warning

आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी मतदारसंघातील कोंभळी फाटा ते कर्जत हा महत्वाचा रस्ता हायब्रीड अँन्युटी या शीर्षकाखाली मंजुर करून आणला होता. या रस्त्यासाठी 61 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर रस्त्याचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली होती. परंतू सरकार बदलल्यानंतर सदर काम रेंगाळले होते. निधी मिळत नसल्याने काम ठप्प झाले होते.

Do not compromise on road quality from Kombli Phata to Karjat,  Otherwise be prepared for the consequences - MLA Ram Shinde's warning

मविआ सरकारच्या काळात प्रशासन आणि लोक प्रतिनिधी सोयीस्करपणे डोळेझाक करत होते. वनविभागाच्या परवानगीच्या नावाखाली तर कधी एजन्सीच्या नावाने सबब सांगून सदर काम बंद पाडून तीन वर्षांपासून जनतेची दिशाभूल चालू होती. पण राज्यात सत्ता बदल झाला आणि या रस्त्याचे भाग्य उजळले. आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याला वनविभागाची परवानगी मिळाली आणि मोठा अडथळा दुर झाला आहे. आता या रस्त्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द आमदार राम शिंदे यांनी आजच्या दौर्‍यात दिला.

आमदार राम शिंदे यांनी आज 14 रोजी कोंभळी फाटा ते कर्जत या रस्त्याची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी महत्वाचा रस्ता इतके दिवस बंद का होता ? असे विचारले असता सर्व अधिकारी निरुत्तर झाले. संबंधित एजन्सीने तत्कालीन सरकारने पैसे अडवून ठेवल्याचे सांगितले. रस्त्याच्या गुणवत्तेसंबंधी गुणवत्ता तपासणी एजन्सीला प्रश्न विचारले असता तेही निरुत्तर झाले. झालेल्या कामाच्या दर्जा बाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत सदर कामाची दुसऱ्या गुणवत्ता नियंत्रक कंपनी कडून तपासणी करावी अश्या सुचना देत पुढील आठवड्यात मंत्रालयीन स्तरावर रस्त्याच्या विषयावर मिटिंग घेण्याचे सूतोवाच यावेळी शिंदे यांनी केले.

रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित एजन्सीकडे १० वर्ष आहे. याचा अर्थ दहा वर्षे त्या रस्त्याला दुरुस्ती होऊ नये असा आहे. तो दहा वर्षे टिकेल इतका दर्जेदार असावा. परंतु १० वर्ष तर दूरच दुसऱ्या वर्षीपासून रस्ता खराब होतो आणि मग एजन्सी ते खड्डे भरण्याचे काम करते. हे अपेक्षित नाही. त्यामुळे गुणवतेच्या बाबतीत कोणतीही कसूर करू नये. संबंधित यंत्रणेला योग्य सूचना देऊन रस्ता जनतेसाठी दर्जेदार कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत अश्या सुचना यावेळी आमदार शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

शासनाकडून सर्व सहकार्य होईल त्याबाबत एजन्सीने काळजी करू नये परंतु रस्त्याच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड करू नये असा थेट इशारा यावेळी आमदार राम शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराला दिला.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपअभियंता कर्जत विभाग प्रशांत वाकचौरे, शाखा अभियंता बहिरजी शिंदे, विशाल शर्मा तसेच कोठारी कन्स्ट्रक्शन एजन्सीचे अनिल कोठारी, आदी अधिकारी तसेच जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन पोटरे, अशोक खेडकर,गणेश क्षीरसागर ,पप्पू शेठ धोदाड, गणेश पालवे, शेखर खरमरे, सुनील यादव, ज्ञानदेव लष्कर, अनिल गदादे व इतर कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.