शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय : भाविकांच्या लूटमारी कारणीभूत ठरणाऱ्या चार वस्तूंवर शनी मंदिरात बंदी !

शनिशिंगणापूर : राज्यात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरात पूजा साहित्य विक्री च्या माध्यमातून सातत्याने भाविकांची फसवणूक होत होती. ही फसवणूक रोखण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे. (Big decision of Shanishinganapur Devasthan Trust, Ban on four items causing looting of devotees in Shani Mandir)

अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान परिसरामध्ये पूजा साहित्याच्या माध्यमांतून भाविकांची सातत्याने लुटमार होत होती,याबाबत देवस्थान ट्रस्टकडे सातत्याने भाविकांकडून तक्रारी येत होत्या, मात्र यावर आजवर कुठलीच कारवाई होत नव्हती.

मात्र आता सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल देवस्थानने घेतली आहे. भाविकांच्या लूटमारी कारणीभूत ठरणाऱ्या पूजा साहित्यातील चार वस्तूंवर बंदी आणण्याचा मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने शनियंत्र, नवग्रह यंत्र, पादुका आणि चांदी सारखा दिसणारा शिक्का या चार मंदिरात घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. पूजा साहित्य विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना देवस्थान ट्रस्टने दिल्याची माहिती समोर येत आहे. पूजेच्या ताटात बंदी असलेल्या वस्तू दिसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देवस्थान ट्रस्टने दिला आहे.

दरम्यान शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट ने घेतलेल्या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या निर्णयामुळे पूजासाहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. यंत्र बंदीचा निर्णय कायमस्वरूपी आमलात राहावा अशी मागणी आता भाविकांकडून होत आहे.

शनैश्वर देवस्थानने यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेले आहे, असे सांगून पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात, अशा वस्तूंवर बंदी घालावी व सक्तीची अडवणूक करीत असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त ईटीव्हीमराठीने दिले आहे.